वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. हा निर्णय भारतासाठी चुकीचा ठरला. कारण भारताने 50 षटकात 7 गडी गमवून 351 धावा केल्या आणि विजयासाठी 352 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान वेस्ट इंडिजला गाठणं कठीण जाईल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. वेस्ट इंडिजने 5 गडी आणि 8 चेंडू राखून सामना जिंकला. वेस्ट इंडिजने हे आव्हान सहज गाठलं आणि मालिकेचा शेवट गोड केला. खरं तर दुसऱ्या वनडे सामन्यानंतरच भारताने ही मालिका खिशात घातली होती. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजला विजय मिळाला तरी ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली.
भारताचा डाव
भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 351 धावा उभारल्या. भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. कर्णधार शुभमन गिल अवघ्या 1 धावेवर आणि विराट कोहली शून्य धावांवर तंबूत परतले. मात्र, सलामीवीर रोहित शर्माने 85 चेंडूंत 92 धावांची आणि ऋतुराज गायकवाडने 69 चेंडूंत 57 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत डाव सावरला. त्यानंतर यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुलने अवघ्या 87 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 129 धावांची नाबाद शतकी खेळी केली. त्याला मधल्या फळीत नमन धीरने 21 चेंडूंत 30 धावा करून चांगली साथ दिली. तर खालच्या फळीत नितीश कुमार रेड्डीने 9, अंशुल कंबोजने 9 चेंडूंत 17 धावा आणि गुरनूर ब्रार 8 धावांवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजकडून गोलंदाजीत जायडन सील्सने 3, किमो पॉलने 2 आणि गुडाकेश मोती याने 1 बळी घेतला.
IND vs WI, 3rd ODI: रोहित शर्माचं वेस्ट इंडिजविरुद्ध शतक हुकलं, पण नोंदवला असा विक्रम
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा वनडे सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण भारताला तिसऱ्या ...
वेस्ट इंडिजचा डाव
सलामीवीर जॉन कॅम्पबेल अवघ्या 10 धावांवर मोहम्मद सिराजचा बळी ठरला. मात्र, त्यानंतर कर्णधार आणि यष्टिरक्षक शाई होपने 143 चेंडूंत 17 चौकार आणि 3 षटकारांसह 162 धावांची नाबाद मॅच-विनिंग खेळी केली. त्याला आमीर जंगूने 56 चेंडूंत 67 धावांची साथ दिली.
त्यानंतर शेर्फेन रदरफोर्ड 24 धावा करून नमन धीरच्या गोलंदाजीवर बाद झाला. मधल्या फळीत किमो पॉलने 35 चेंडूंत 44 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत गुरनूर ब्रारच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी संघाला विजयाच्या जवळ आणले. मॅथ्यू फोर्ड 7 धावांवर कुलदीप यादवचा बळी ठरला. शेवटी, गुडाकेश मोती याने 14 चेंडूंत नाबाद 19 धावा करत शाई होपच्या साथीने ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारताकडून मोहम्मद सिराज, नमन धीर, गुरनूर ब्रार आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.
भारत वेस्ट सामन्यात नकोसा विक्रम
भारत वेस्ट इंडिज तिसऱ्या वनडे सामन्यात एकूण 9 झेल सुटले. वेस्ट इंडिजकडून 6 आणि भारताकडून 3 झेल सुटले. त्यामुळे सामन्यातील गचाळ क्षेत्ररक्षण चर्चेत राहिलं. एका एकदिवसीय सामन्यात संयुक्तपणे सर्वात जास्त झेल सुटण्याचा विक्रम श्रीलंका आणि इंग्लंड यांच्या नावार आहे. या दोन्ही संघांनी मिळून 2011 च्या विश्वचषक उपांत्यपूर्व सामन्यात कोलंबो येथील आरपीएस मैदानावर एवढेच (9) झेल सोडले होते.