Saturday, October 3, 2026

IND vs WI, 3rd ODI: रोहित शर्माचं वेस्ट इंडिजविरुद्ध शतक हुकलं, पण नोंदवला असा विक्रम

IND vs WI, 3rd ODI: रोहित शर्माचं वेस्ट इंडिजविरुद्ध शतक हुकलं, पण नोंदवला असा विक्रम
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा वनडे सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण भारताला तिसऱ्या षटकातच दोन धक्के बसले. कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाले. त्यानंतर रोहित शर्माने मोर्चा सांभाळला आणि ऋतुराज गायकवाडसोबत संयमी भागीदारी केली. रोहित शर्माने या सामन्यात 85 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 92 धावा करून बाद झाला. खरं तर रोहित शर्माला या वनडे मालिकेत सलग दुसरं शतक ठोकण्याची संधी होती. मात्र ही संधी अवघ्या 8 धावांनी हुकली. यापूर्वी दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने 138 धावांची खेळी केली होती . तिसऱ्या वनडे सामन्यात शतकी खेळी करण्याची संधी हुकली असली तरी त्याने सचिन तेंडुलकरचा 22 वर्षे जुना जागतिक विक्रम मोडला आहे.

रोहित शर्माने नोंदवला असा विक्रम

तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने दुसरी धाव घेतली आणि ओपनर म्हणून 10000 धावा पूर्ण करणारा जगातील सर्वात वेगवान फलंदाज बनला आहे. त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा तब्बल 22 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. रोहित शर्माने 202 डावात 10 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. तर सचिन तेंडुलकरने हा पल्ला गाठण्यासाठी 214 डाव खेळले होते. रोहित शर्मा 10 हजार धावांचा पल्ला गाठणारा क्रिकेट जगातील केवळ चौथा सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी केवळ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (15310 धावा), श्रीलंकेचे दिग्गज सनथ जयसूर्या (12740 धावा) आणि वेस्ट इंडिजचा 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेल (10179 धावा) यांनाच ओपनर म्हणून हा टप्पा गाठता आला होता.

रोहित शर्माचा भागीदारीचा नवा पल्ला

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी 137 धावांची भागीदारी केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीत 75व्यांदा 100हून अधिक धावांची भागीदारी करण्याचा पराक्रम केला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतकी भागीदारी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता जगातील तिसरा यशस्वी फलंदाज बनला आहे. या यादीत महान सचिन तेंडुलकर 99 भागीदारींसर पहिल्या क्रमांकावर आणि विराट कोहली 88 भागीदारीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, या सामन्यात रोहित शर्मासोबत शतकी भागीदारी करणारा ऋतुराज गायकवाड हा 15वा वेगळा साथीदार ठरला आहे.

रोहित शर्मा नर्व्हस 90चा शिकार

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा 90 ते 99 धावांच्या दरम्यान बाद होण्याची ही गेल्या सात वर्षांतील पहिलीच वेळ आहे. यापूर्वी रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये 90च्या घरात बाद होण्याचा शेवटचा प्रसंग मार्च 2019 मध्ये घडला होता. मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 95 धावांवर बाद झाला होता.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >