अंधेरी यारी रोड आणि लोखंडवाला जंक्शन उड्डाणपूलाचे काम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होणार
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पश्चिम विभागातील अंधेरी (पश्चिम) येथील यारी रोड आणि लोखंडवाला बॅक रोड जंक्शन, अमरनाथ टॉवर इमारतीजवळ महानगरपालिकेच्या वतीने उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. या पुलाचे बांधकाम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातून प्रवासासाठी लागणारा सुमारे ३० मिनिटांचा कालावधी कमी होऊन तो सुमारे १० मिनिटांपर्यंत येण्याची शक्यता आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे वेसावे, यारी रोड, लोखंडवाला आणि लगतच्या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, परिसरातील वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून मुंबईत अनधिकृत फ्लेक्सविरोधात राबवली जाणार विशेष मोहीम एकल खिडकी डिजिटल प्रणालीद्वारे महसूल वाढवण्यावर ...
महानगरपालिकेच्या विकास नियोजन आराखड्यानुसार अंधेरी (पश्चिम) येथील कवठे खाडीच्या पूर्व आणि पश्चिम बाजूस १८.३० मीटर रुंदीचा विकास नियोजन रस्ता प्रस्तावित आहे. मात्र, कवठे खाडीमुळे रस्ता विकसित करण्याच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याने नियोजित रस्ता पूर्ण करण्याच्या दृष्टीने या खाडीवर पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रस्तावित पुलामुळे यारी रोड, पंचमार्ग, वेसावे परिसराचा सरदार वल्लभभाई पटेल नगर (अंधेरी पश्चिम), लोखंडवाला संकुल आणि समर्थनगर या परिसरांशी थेट संपर्क प्रस्थापित होण्यास मदत होणार आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळास भेट देऊन पाहणी केली. तसेच, पूल प्रकल्पाच्या प्रगतिचा आढावा घेतला. या पुलाचे बांधकाम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले.
या पुलाची एकूण लांबी २०६ मीटर असून तो कवठे खाडीवरून जाणार आहे. यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल नगरच्या बाजूचा जोडमार्ग ४० मीटर, तर अमरनाथ टॉवरच्या बाजूचा जोडमार्ग ५६ मीटर आहे. मुख्य पुलाची लांबी ११० मीटर असून पुलाची रुंदी ११ मीटर आहे. जोडमार्ग आणि मुख्य पुलाच्या भागाची रुंदी समान ठेवण्यात आली आहे.
पुलाच्या अधिसंरचनेसाठी ११० मीटर लांबीचा एकेरी पल्ल्याचा पोलादी ‘बास्केट हँडल आर्च’ सांगाडा प्रस्तावित करण्यात आला आहे. या पोलादी कमानीसाठी ताणताऱ्यांचा वापर करण्यात येणार असून ते पुलाच्या डेक स्लॅबला संलग्न केले जातील. पुलाच्या अधोरचनेसाठी प्रबलित सिमेंट काँक्रीटची आधार भिंत आणि आधारमुकुट प्रस्तावित करण्यात आले आहेत. पुलाच्या पायाभरणीसाठी प्रबलित सिमेंट काँक्रीट पायाभरणी करण्यात आली आहे.
या पुलामुळे वेसावे परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच, परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन पूर्व - पश्चिम दिशेतील वाहतूक संपर्क अधिक सक्षम होणार आहे. आगामी वेसावे - वांद्रे सागरी सेतू आणि मुंबई किनारा रस्ता प्रकल्प (उत्तर) सुरू झाल्यानंतर हा पूल पर्यायी मार्ग म्हणूनही उपलब्ध होणार आहे.