Wednesday, October 7, 2026

Nashik Crime : नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन ! फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव, चारित्र्यावरती संशय अन्...

पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपिक असलेला संशयित पती अनिल पवार याला पोलिसांनी अटक केली असून, नाशिक न्यायालयाने त्याला ९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Nashik Crime : पोलीस दलात कार्यरत असलेल्या पतीकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला आणि चारित्र्याच्या संशयाला कंटाळून एका विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. संतापजनक म्हणजे विष प्राशन केल्यानंतर या महिलेने स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठले, मात्र पतीने उपचारासाठी डिपॉझिट न भरता तिला रुग्णालयाच्या पायऱ्यांवरच सोडून पळ काढल्याचा धक्कादायक आरोप झाला आहे. दीपाली अनिल पवार (वय ३२, रा. क्लासिक निकेतन अपार्टमेंट, महात्मानगर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. (Nashik Crime News)

नेमकं प्रकरण काय ?

मृत दिपालीचा पती अनिल हा सुरुवातीला एसआरपीएफ (SRPF) दौंड येथे आणि सध्या नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. तर दीपाली अनिल पवार या जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका (नर्स) म्हणून कार्यरत होत्या. मात्र अनिलने दीपाली यांच्या पगाराचे एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून सर्व पैसे काढून घेतले होते. जेव्हा दीपाली यांनी आपल्या ७ वर्षांच्या मुलाच्या शिक्षणासाठी पगाराचे कार्ड परत मागितले, तेव्हापासून त्यांचा छळ अधिकच वाढला. कामाच्या ठिकाणाहून फोन आल्यास पती त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना बेदम मारहाण करत असे. या त्रासाला कंटाळून त्यांनी यापूर्वी कौटुंबिक हिंसाचाराची तक्रारही दाखल केली होती. (Nashik Crime News)

फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव

दरम्यान, अहिल्यानगर येथे दीपाली पवार यांनी स्वतःच्या कमाईतून एक फ्लॅट खरेदी केला होता. मात्र हा फ्लॅट दीर सुनील याच्या नावावर करण्यासाठी पती आणि सासरच्या लोकांकडून दबाव टाकला जात होता. सासरच्या त्रासाला कंटाळून अखेर दीपाली यांनी विष प्राशन केले. विष घेतल्यावर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी धैर्याने स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठले. मात्र संतापजनक संशयित पतीने उपचारासाठी लागणारे पैसे भरण्यास साफ नकार दिला आणि गंभीर अवस्थेत असलेल्या दीपाली यांना जिल्हा रुग्णालयाच्या पायऱ्यांवर सोडून तिथून पळ काढला. (Nashik Crime News)

९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

या प्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपिक असलेला संशयित पती अनिल पवार याला पोलिसांनी अटक केली असून, नाशिक न्यायालयाने त्याला ९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.मात्र पोलिसाच्याच पत्नीनं अशाप्रकारे छळाला कंटाळून आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >