
मुंबई : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उफाळलेल्या बंडाळीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बंडखोरांना दम भरला आहे. ‘‘एकदा बाहेर तो कायमचा बाहेर, एवढे लक्षात ठेवा. अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, दादांसारखी मी नाही,’’ असे सांगत सुनेत्रा पवार यांनी नाव न घेता पुरुषोत्तम जगताप यांच्यावर निशाणा साधला. कारखाना निवडणुकीपुरते मर्यादित असलेले हे वक्तव्य पक्षातील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांनाही सूचक इशारा मानले जात आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली असून पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या पाठिंब्याने ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. या पार्श्वभूमीवर प्रचारादरम्यान सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. ‘‘आपल्या सर्वांचे संबंध चांगले आहेत. नंतर कोण जवळ येणार, अशा अनेक अफवा आहेत. कुठल्याही चुकीच्या अफवेला बळी पडू नका. एकदा बाहेर तो कायमचा बाहेर,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या सोशल मीडियावर अनवाणी पायाने साडी नेसून धावत असलेल्या एका महिलेचा व्हिडिओ चांगलाच वायरल होतोय. ही व्हिडिओ आहे झारखंड येथील. झारखंड येथील रामगढ ...
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी काही नेत्यांशी मतभेद झाले तरी त्यांनी त्यांना पुन्हा सोबत घेतल्याचे संदर्भ देत सुनेत्रा पवार यांनी, ‘‘अजितदादा मोठ्या मनाचे होते; दादांसारखी मी नाही,’’ असे सांगितले. त्यामुळे सोमेश्वरच्या निवडणुकीतील बंडखोरीवरून त्यांनी पक्षातील भविष्यातील समीकरणांबाबतही कठोर भूमिका सूचित केल्याची चर्चा आहे.
दरम्यान, कारखान्याच्या अध्यक्षपदावरूनही सुनेत्रा पवार यांनी स्पष्टीकरण दिले. ‘‘अनेक चुकीच्या अफवा ऐकायला येत आहेत. कारखान्याचा अध्यक्ष सर्वसमावेशक असेल. सर्वांच्या मर्जीनुसार अध्यक्षाची निवड केली जाईल. अध्यक्ष अगोदरच ठरवलेला नाही. निवडणुकीच्या निकालानंतर अध्यक्ष कोण, हे ठरवू,’’ असे त्यांनी सांगितले. तिरंगी निवडणूक
सोमेश्वर कारखान्याची निवडणूक आता तिरंगी झाली आहे. अजित पवार यांच्या पॅनलविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाने ‘सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल’ उभे केले असून या पॅनलची जबाबदारी युगेंद्र पवार यांच्याकडे आहे. दुसरीकडे, पुरुषोत्तम जगताप यांच्या स्वतंत्र पॅनलमुळे निवडणुकीतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने बारामतीतील पवार कुटुंबीयांच्या राजकारणातील अंतर्गत समीकरणेही चर्चेत आली आहेत.






