मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन पथक गुरुवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे. ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात पावसाची स्थिती, शेतीपिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न यांचा जिल्हानिहाय आढावा घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्रीय पथकासमोर दुष्काळी परिस्थितीचे सविस्तर सादरीकरण केले.
केंद्राच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली हे पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहे. कृषी, जलसंपदा, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, अन्न व सार्वजनिक वितरण, पशुसंवर्धन, अर्थ विभाग, नीती आयोग यांसह विविध विभागांतील प्रशासकीय आणि तांत्रिक अधिकारी पथकात आहेत. पथकाच्या मुंबईतील आगमनानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या उपस्थितीत बैठक झाली. पावसाच्या कमतरतेमुळे राज्यातील काही भागांत निर्माण झालेली पाणीटंचाई, आगामी काळातील टँकरची गरज, शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजूर आणि जमीनधारकांचे प्रश्न, मजुरांच्या स्थलांतराची शक्यता तसेच शेतकरी आत्महत्यांची परिस्थिती याकडे मुख्य सचिवांनी केंद्रीय पथकाचे लक्ष वेधले.
मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव विनिता वेद-सिंगल यांनी राज्यातील पावसाची स्थिती, अल निनोमुळे हवामान आणि पावसावर झालेला परिणाम तसेच शेतीपिकांच्या नुकसानीची तांत्रिक माहिती सादर केली. पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचाही आढावा यावेळी देण्यात आला. कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह आणि आयुक्त सूरज मांढरे यांनी पिकांचे नुकसान आणि जिल्हानिहाय परिस्थितीची माहिती पथकासमोर मांडली. पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी जनावरांच्या चाऱ्याची सद्यस्थिती तसेच पुढील सात महिन्यांत निर्माण होऊ शकणाऱ्या परिस्थितीची माहिती दिली. राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवरही परिणाम झाला आहे. सध्या टँकरद्वारे सुरू असलेला पाणीपुरवठा, मागील तीन वर्षांतील पाण्याची तुलनात्मक स्थिती आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रस्तावित गावांची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन आणि भूजल सर्वेक्षण व विकास आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिली.
महाखनिज २.० प्रणालीतील तांत्रिक अडथळे तातडीने दूर करा. पोर्टल संथ होणे, वारंवार एरर येणे किंवा प्रणालीतील अडचणींमुळे नागरिकांची गैरसोय होता कामा नये. ...
जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, रोजगार हमी योजनेचे सचिव अप्पासाहेब धुळाज तसेच ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांनीही सद्यस्थिती आणि आगामी सात महिन्यांतील संभाव्य परिस्थितीचा आढावा सादर केला. लघुपाटबंधारे तलाव, गावांतील पाण्याचे स्रोत आणि त्यांच्या सद्यस्थितीची माहितीही पथकाला देण्यात आली.
प्रत्यक्ष पाहणीसाठी विविध पथके
राज्य सरकारने सादर केलेली आकडेवारी, उपलब्ध पुरावे आणि विविध विभागांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष पाहणीचे नियोजन केले. राज्यातील विविध भागांत जाऊन दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि पाणीटंचाईची पाहणी करण्यासाठी पथकातील अधिकाऱ्यांची विविध पथकांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. जास्तीत जास्त क्षेत्राचा प्रत्यक्ष आढावा घेण्याचे नियोजन असून, स्थानिक अधिकारी, तज्ज्ञ आणि राज्य शासनाचे संबंधित अधिकारीही या पाहणीवेळी उपस्थित राहणार आहेत. प्रत्यक्ष पाहणी पूर्ण केल्यानंतर केंद्रीय पथक मुंबईत परतणार असून, ११ ऑक्टोबर रोजी दुष्काळी परिस्थितीबाबत पुढील सविस्तर चर्चा होणार आहे. या पाहणीच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळाची वस्तुस्थिती, शेतीपिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि आवश्यक उपाययोजनांची माहिती केंद्र सरकारसमोर मांडली जाणार आहे.