जाती-पातीच्या भिंती दूर करत विद्यार्थ्यांसाठी उभारणार एकत्रित हॉस्टेल; १३ ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे बावनकुळेंचे निर्देश

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. जाती-पातीच्या भिंती दूर करून सर्व समाजातील विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्यभरात एकत्रित विद्यार्थी वसतिगृहे उभारण्यात येणार असून त्यासाठी योग्य जागा निश्चित करून १३ ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत, असे मंत्री बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.


विभागीय स्तरावर एक हजार, तर जिल्हा स्तरावर ५०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेची वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत झालेल्या या बैठकीत आदिवासी, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, मराठा तसेच सर्व समाजातील विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृहांऐवजी भविष्यात एकाच ठिकाणी निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेवर चर्चा झाली. त्यासाठी योग्य आणि सोयीस्कर शासकीय जागा निश्चित करून प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या.


वसतिगृहासाठी जागा निवडताना केवळ उपलब्ध शासकीय जागेचा विचार न करता विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जागेची निवड करावी, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये-जा करणे सोपे व्हावे, सार्वजनिक वाहतूक उपलब्ध असावी तसेच आरोग्य सुविधा, बाजारपेठ आणि इतर दैनंदिन गरजा सहज उपलब्ध होतील, अशा ठिकाणी जागा असावी. भविष्यातील विस्ताराची शक्यताही लक्षात घ्यावी, असे त्यांनी सांगितले.


राज्यात यापूर्वी विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र वसतिगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, पुढील काळात उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहांमध्ये सर्व समाजातील विद्यार्थ्यांना एकत्रितपणे निवासाची सुविधा देण्याची संकल्पना राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार पायाभूत सुविधा मिळण्याबरोबरच त्यांच्यात परस्पर संवाद, सलोखा आणि सामाजिक समरसता वाढण्यासही यामुळे मदत होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.






महाज्योतीच्या वसतिगृहांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा
महाज्योतीमार्फत वसतिगृहांसाठी मागणी करण्यात आलेल्या जागांबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या. चंद्रपूर, बीड, परभणी, धाराशिव, नांदेड, सांगली, सोलापूर, अकोला, यवतमाळ, गोंदिया आणि वाशिम या जिल्ह्यांतील जागांबाबत आवश्यक कार्यवाही करून प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यास सांगण्यात आले. महाज्योतीच्या वसतिगृहांसाठी किमान १ हजार विद्यार्थ्यांची क्षमता असलेले वसतिगृह उभारता येईल, अशा स्वरूपाचे प्रस्ताव तयार करावेत. उपलब्ध जागेचे क्षेत्रफळ, स्थान, दळणवळणाची सुविधा, परिसरातील शैक्षणिक व नागरी सुविधा आणि भविष्यातील विस्ताराची शक्यता यांचा विचार करून प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश देण्यात आले.


काही ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याबाबत शासनस्तरावर निर्णय झालेला असतानाही संबंधित जागांचे प्रॉपर्टी कार्ड पूर्ण झालेले नसल्याने पुढील कार्यवाही प्रलंबित आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रॉपर्टी कार्डची कार्यवाही पूर्ण करून आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत, असेही बावनकुळे यांनी सांगितले.


विद्यार्थ्यांच्या सोयीला प्राधान्य
“आपणही विद्यार्थी होतो. त्या काळातील विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन या जागांकडे पाहा. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी विशेष लक्ष द्या,” असे सांगत बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या कामात संवेदनशीलतेने लक्ष घालण्याचे आवाहन केले. जागा निश्चिती आणि प्रस्ताव सादर करण्यात दिरंगाई किंवा हयगय खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या आधारे सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी एकत्रित वसतिगृहांचा शासनस्तरीय आराखडा तयार करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

NCMC Card : एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डमध्ये आता फक्त 5 रुपयांचा टॉपअप; प्रवाशांना मोठा दिलासा

NCMC Card : एसटी महामंडळाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड वापरणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय

Eknath Shinde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; गरज पडल्यास नियम बाजूला ठेवून मदत करू - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बुलढाणा : दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबांना सरकार आणि शिवसेना मदतीसाठी उभी राहील, असा विश्वास

CM Relief Fund : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर; गरजू रुग्णांना मिळणार नवा आधार

आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरजू रुग्णाचे उपचार थांबू नयेत, या उद्देशाने काम करणाऱ्या मुख्यमंत्री सहायता

सहकारी साखर कारखान्यांच्या 'शासकीय कर्ज हमी'ला लगाम; 100 कोटींची मर्यादा

मुंबई : राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (एनसीडीसी) राज्य शासनाच्या हमीवर सहकारी साखर कारखान्यांना दिल्या

Bhusawal Nagpur Express : भुसावळ-नागपूर ‘दादाजी धाम’ एक्स्प्रेसला मंजुरी; बऱ्हाणपूर, खंडवामार्गे धावणार

भुसावळ आणि नागपूरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कोविड काळात बंद झालेली भुसावळ-नागपूर

Devendra Fadnavis : ...तर अवैध होर्डिंग लावणाऱ्यांच्या पुरस्कार यादीत माझेही नाव टाका !

मुंबई : पुणे शहरातील अवैध होर्डिंग आणि अतिक्रमणांविरोधात महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईचे