मुंबई (विशेष प्रतिनिधी)
पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत, शिवडी परिसरातील डी. जी. महाजनी व जेरबाई वाडीया मार्गालगतच्या पदपथावर अडथळा निर्माण करणारी ०७ अनधिकृत दुकाने, १५ तात्पुरते ताडपत्रीचे शेड, ०२ अनधिकृत कट्टे आणि २० फेरीवाल्यांवर गुरुवारी ०८ ऑक्टोबर २०२६ रोजी कारवाई करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात, पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी महानगरपालिकेकडून 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर, उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त (एफ दक्षिण विभाग) वृषाली इंगुले यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या कारवाईत शिवडी येथील डी. जी. महाजनी व जेरबाई वाडीया मार्गालगतचे पदपथ मोकळे करण्यात आले. या अंतर्गत, पदपथांवर उभारण्यात आलेली ०७ अनधिकृत दुकाने, १५ तात्पुरते ताडपत्रीचे शेड, ०२ अनधिकृत कट्टे, ०४ बेवारस साहित्य साठवण ठिकाणे आणि २० फेरीवाल्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यावेळी, पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
घाटकोपरमध्ये रस्ता रुंदीकरणामुळे बाधित २८ बांधकामांवर निष्कासनाची कारवाई
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन विभाग कार्यालयाच्या वतीने घाटकोपर (पश्चिम) येथील झुनझुनवाला महाविद्यालय ते अंधेरी- घाटकोपर जोड मार्गादरम्यान रस्ता रुंदीकरणामुळे बाधित २८ बांधकामांवर बुधवारी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी कारवाई करण्यात आली. सहायक आयुक्त (एन विभाग) जयदीप मोरे यांच्या नेतृत्वात ही निष्कासनाची मोहीम हाती घेण्यात आली. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, पादचाऱ्यांसाठी सुलभ पदपथ उपलब्ध करुन देण्यासाठी महानगरपालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे, पदपथांवर अडथळा निर्माण होईल, असे अनधिकृत बांधकाम करू नये अथवा साहित्य ठेवू नयेत. असे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.