Thursday, October 8, 2026

Delhi Building Collapse : दिल्लीतील पाच मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 8 जखमी

मृतांमध्ये तीन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नवी दिल्ली : दिल्लीतील न्यू सीमापुरी परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याच्या घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. या दुर्घटनेत 8 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी सुमारे 28 तास बचावकार्य सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास न्यू सीमापुरी येथील अरुंद गल्ल्यांमध्ये ही इमारत कोसळली. या दुर्घटनेत इमारतीतील रहिवासी आणि जवळ उभे असलेले लोक अडकले होते. सुरुवातीला दोन मुले आणि 21 वर्षीय गर्भवती महिलेच्या मृत्यूची माहिती समोर आली होती. त्यानंतर ढिगाऱ्याखालून आणखी मृतदेह सापडल्याने मृतांचा आकडा चारवर पोहोचला. मृतांमध्ये तीन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखालून शरीराचे काही अवयव आणि अवशेषही सापडले आहेत. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. डीएनए तपासणीद्वारे हे अवशेष एकाच व्यक्तीचे आहेत की वेगवेगळ्या व्यक्तींचे, हे निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्राथमिक चौकशीनुसार, शेजारच्या इमारतीत सुरू असलेल्या पाडकामामुळे ही दुर्घटना घडली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मजूर व्हायब्रेटिंग मशीनच्या साहाय्याने काम करत होते. या कामामुळे शेजारील इमारतीच्या रचनेवर परिणाम झाला असण्याची शक्यता तपासली जात आहे.

तपासातील प्राथमिक माहितीनुसार, इमारतीचे क्षेत्रफळ सुमारे 25 चौरस यार्ड होते. तळमजल्यावर आधीच चार मजले बांधण्यात आले होते आणि वरच्या मजल्यावर आणखी खोल्या तयार करण्याचे काम सुरू असल्याचा संशय आहे. इमारतीचा पाया कमकुवत असणे आणि बांधकामातील त्रुटी ही संभाव्य कारणे तपासली जात आहेत.

दरम्यान, इमारत कोसळण्याच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी दंडाधिकारी चौकशी सुरू करण्यात आली आहे. भूकंपामुळे इमारतीला तडे गेल्याची शक्यताही संबंधित यंत्रणांकडून तपासली जात आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >