विरोधकांचे आंदोलन ‘अराजकतेचे व्याकरण’ असल्याचा आरोप
मुंबई : अमेरिकेतील उद्योगपती एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या टीकेचे समर्थन करून भारत सरकारवर प्रश्न उपस्थित करणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे भारतीय व्यवस्थेशी बेईमानी करीत असल्याची टीका राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शुक्रवारी केली. देशातील प्रश्न मांडण्यासाठी लोकसभेचे व्यासपीठ उपलब्ध असताना सभागृहाबाहेर आंदोलन करून विरोधक अराजकता निर्माण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
एलॉन मस्क यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी भारत सरकारवर केलेल्या टीकेविषयी पत्रकारांनी शेलार यांना विचारले. हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्याचे नमूद करून ते म्हणाले, “भारतातील इन्फोसिस, विप्रो आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसमोर अमेरिकेत निर्बंधांचे प्रश्न उपस्थित होत असताना, भारतीय तरुणांच्या नोकरी आणि करिअरचा विचार करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांनी अमेरिकेतील कंपनीची बाजू घेणे ही बेईमानी आहे.”
एलॉन मस्क आणि स्टारलिंक यांनी भारतीय व्यवस्थेविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत सुरक्षा पडताळणीच्या नियमावलीसंदर्भातील काम सुरू असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या विषयावर केंद्र सरकार आणि संबंधित अधिकारी निर्णय घेतील. मात्र, त्या निर्णयाची प्रतीक्षा न करता राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका प्रतिक्रियेच्या बाजूने भूमिका घेणे म्हणजे भारतीय प्रशासकीय व्यवस्थेशी बेईमानी करण्यासारखे असल्याचे शेलार म्हणाले. स्टारलिंकच्या मागण्यांबाबत महाराष्ट्राच्या दृष्टीने बोलताना, तंत्रज्ञानाच्या निकषांवर अयोग्य ठरणारा निर्णय सरकार घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जिओ किंवा अंबानी यांचा उल्लेख होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही कंपनीचा विचार न करता भारताच्या भविष्यासाठी जे योग्य असेल, त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दिल्लीत विरोधकांकडून सुरू असलेल्या आंदोलनावरही शेलार यांनी टीका केली. “हे आंदोलन म्हणजे अराजकतेचे व्याकरण आहे. लोकसभेत प्रश्न मांडण्याची संधी आहे. राज्यघटनेने दिलेल्या व्यासपीठावर चर्चा करण्याऐवजी सभागृहाबाहेर येऊन अराजकता निर्माण केली जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. देशात आणीबाणी लागू असल्याच्या अभिजित दीपके यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना शेलार यांनी त्यांच्यावर टीका केली. आणीबाणी म्हणजे काय, हे त्यांनी काँग्रेसलाच विचारावे, असे सांगत काँग्रेसच्या सत्ताकाळात अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या बाबतीत काय घडले, याची आठवण करून दिली. आणीबाणीच्या विषयावर बोलताना काँग्रेसच्या इतिहासाचा विचार करावा, असेही ते म्हणाले. सीजेपीच्या आंदोलनामागे काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही शेलार यांनी केला.