मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबई महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा कोणत्याही ठिकाणी अथवा कोणत्यांही प्रकारे गैरवापर आढळून आल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनातर्फे याबाबत स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार, भविष्यातील पेयजलाची गरज लक्षात घेऊन दिनांक ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार पाणी बचतीच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने विविध अतिरिक्त सूचना जारी केल्या आहेत.
पुणे : अपुऱ्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी पुणे महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 15 ऑक्टोबरपासून दर ...
पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल असून, आज केलेली पाणी बचत ही उद्याच्या सुरक्षित जलभविष्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ हा संदेश केवळ घोषवाक्यापुरता मर्यादित न ठेवता, तो प्रत्येकाने आपल्या कृतीतून प्रत्यक्षात आणावा आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणी बचतीच्या प्रयत्नांना सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. यासमवेतच, दुय्यम वापरांसाठी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळण्याबरोबरच पर्यायी जलस्रोतांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
‘एल निनो’आणि ‘हिंदी महासागर द्विध्रुव’(इंडियन ओशन डायपोल — आयओडी) यांसारख्या हवामानविषयक घटकांच्या प्रभावामुळे सन २०२६ मध्ये कमी पाऊस झाला. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांतील पाणीसाठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील उपलब्ध जलसाठा अधिक काळ टिकवून ठेवणे आवश्यक आहे. पाण्याची वाढती मागणी, ‘एल निनो’मुळे संभाव्य तापमानवाढ आणि धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे.
पाण्याची बचत ही केवळ राज्य शासन किंवा महानगरपालिकेची जबाबदारी नसून, ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येकाने दररोज थोडेसे पाणी वाचवले, तरी संपूर्ण महानगराच्या पाणी बचतीमध्ये मोठे योगदान मिळू शकते. पाण्याचा अपव्यय टाळणे, उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि पाणी बचतीसाठी इतरांनाही प्रोत्साहित करणे, या छोट्या-छोट्या कृतींमधून आपण मोठा बदल घडवू शकतो. म्हणूनच, सर्व मुंबईकर नागरिकांनी पाण्याचे महत्त्व ओळखून पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाणी बचतीचा संकल्प करावा, असे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
पाणी बचतीसाठी महत्त्वाच्या सूचना
- घरातील नळ विनाकारण सुरू ठेवू नयेत,
- नळ किंवा जलवाहिन्यांमधून होणारी पाण्याची गळती तातडीने दुरुस्त करून घ्यावी,
- वाहनांची व परिसराची स्वच्छता करताना पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा,
- शक्य तेथे पर्यायी जलस्रोतांचा वापर करावा.
- गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक आस्थापना, शैक्षणिक संस्था आणि इतर सार्वजनिक ठिकाणीही पाणी बचतीच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे.
- नागरिक, औद्योगिक व व्यापारी आस्थापना तसेच विविध संस्थांनी पिण्याच्या पाण्याचा अपव्यवय टाळावा.
- जलतरण तलावांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये.
- पिण्याच्या पाण्याच्या वापरा व्यतिरिक्त इतर वापरासाठी विहरी, कूपनलिका, विंधन विहरी यांचा जास्तीत जास्त वापर करावा.
- औद्योगिक व व्यापारी आस्थापना आणि स्पोर्ट्स क्लबना होणाऱया पाणीपुरवठ्यातील २० टक्के कपात सुरू राहणार.
- हे रस्ते धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याऐवजी सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमधील प्रक्रियायुक्त शुद्ध पाणी किंवा बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा.
- बांधकामाच्या ठिकाणी पिण्या व्यतिरिक्त इतर कामांसाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमधील प्रक्रियायुक्त शुद्ध पाणी किंवा बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा.
- वाहने धुणे, उद्यानांमधील झाडांना पाणी घालणे आणि रस्ते अथवा परिसर स्वच्छ करण्यासाठी विहिरी, कूपनलिका व बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा.
- सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि प्रसाधनगृहांचे व्यवस्थापन करणाऱया संस्थांनीही शक्य तितक्या प्रमाणात पर्यायी जलस्रोतांचा वापर करावा.