Monday, October 12, 2026

कसारा येथे 12 दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; 14 ते 16 ऑक्टोबरदरम्यान रेल्वे सेवांवर परिणाम

मुंबईकर आणि कसारा मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून आसनगाव-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी 12 दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकच्या पुढील टप्प्यात 14, 15 आणि 16 ऑक्टोबर 2026 रोजी लोकल तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

मुंबई : आसनगाव - कसारा तिसरी मार्गिका प्रकल्प आणि कसारा यार्डमधील 'अप' यार्ड लाईनच्या विस्ताराच्या कामासाठी मध्य रेल्वेद्वारे कसारा येथे 7 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत 12 दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत 14 ते 16 ऑक्टोबर 2026 दरम्यान होणाऱ्या कामांमुळे उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून, प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रकल्पाचा उद्देश आणि महत्त्व

आसनगाव आणि कसारा दरम्यानच्या तिसऱ्या मार्गिकेचे हे काम कसारा आणि कल्याण दरम्यानच्या प्रकल्पाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे मेल/एक्सप्रेस आणि उपनगरीय रेल्वे सेवांची वाहतूक स्वतंत्र करणे शक्य होणार असून, भविष्यात मार्गिकेची क्षमता वाढवण्यासाठी अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण होईल. यामुळे कामकाजात लवचिकता वाढेल, गाड्यांचे नियमन सुलभ होईल आणि अतिरिक्त गाड्या हाताळण्याची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

ब्लॉकचा कालावधी आणि विभाग

  • तारखा: 14.10.2026 (बुधवार) ते 16.10.2026 (शुक्रवार)

  • वेळा: 14 ऑक्टोबर: दुपारी 15.35 ते रात्री 20.35 वाजेपर्यंत, 15 ऑक्टोबर: दुपारी 15.35 ते संध्याकाळी 19.35 वाजेपर्यंत, 16 ऑक्टोबर (मध्यरात्र): पहाटे 03.00 ते सकाळी 06.00 वाजेपर्यंत, 16 ऑक्टोबर: दुपारी 15.35 ते संध्याकाळी 19.35 वाजेपर्यंत

  • विभाग: कसारा - खर्डी आणि उंबरमाळी - कसारा दरम्यानची 'अप' मेन लाईन (प्लॅटफॉर्म क्र. 1, 3, 4 आणि 'अप' यार्डचा समावेश).

उपनगरीय रेल्वे सेवांवरील परिणाम

ब्लॉकच्या कालावधीत आसनगाव आणि कसारा स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही. काही लोकल गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन आणि ओरिजनेशन आसनगाव स्थानकावरून करण्यात येणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉकपूर्वीच्या आणि ब्लॉकनंतरच्या शेवटच्या व पहिल्या लोकल सेवांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे.

मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे रद्दीकरण व वेळापत्रकात बदल

  • रद्द गाड्या: गाडी क्र. 12262 हावडा - CSMT दुरंतो एक्सप्रेस (प्रवास प्रारंभ 13.102026) आणि गाडी क्र. 12261 CSMT - हावडा दुरंतो एक्सप्रेस (प्रवास प्रारंभ 14.10.2026) रद्द राहतील.

  • वेळापत्रकात बदल: 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी सुटणाऱ्या एलटीटी - गोरखपुर, एलटीटी - सीतापूर, एलटीटी - धनबाद, कामायनी एक्सप्रेस, राजगीर एक्सप्रेस आणि राजधानी एक्सप्रेससह अनेक गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने सुटतील. तसेच काही गाड्यांच्या वेळा मध्यरात्रीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

  • मार्ग बदल: काही गाड्या कल्याण - कर्जत - पुणे - मनमाड मार्गे वळवण्यात आल्या आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने अनेक गाड्या विविध स्थानकांवर काही वेळ नियमन (Regulation) करून चालवण्यात येणार असून काही गाड्या 15 ते 25 मिनिटे उशिराने धावतील.

पायाभूत सुविधांची देखभाल आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा ब्लॉक अत्यंत आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >