
बिहार : बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील हाजीपूरजवळ गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटल्याची दुर्घटना घडली आहे. मंगळवारी (13 ऑक्टोबर 2026) संध्याकाळी राघोपूर परिसरातील रामपूर गावाजवळ ही घटना घडली. या नावेत 35 ते 40 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले असून, मृतांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मृतांचा नेमका आकडा अधिकृतरीत्या स्पष्ट होणे बाकी आहे. ( Bihar Boat Accident)
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रवासी एका अंत्यसंस्कारानंतर आयोजित करण्यात आलेल्या भोजनासाठी जात होते. त्याच वेळी गंगा नदीच्या पात्रात बोट अचानक उलटली. नाव उलटण्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. ही घटना बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या राघोपूर मतदारसंघात घडली आहे.
सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील हवाई वाहतूक ...
प्रवाशांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने नदीकडे धाव घेतली. पाण्यात बुडणाऱ्या प्रवाशांना वाचवण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न सुरू केले. नाव उलटल्यानंतर काही प्रवाशांनी पोहत नदीचा किनारा गाठला आणि आपला जीव वाचवला. दरम्यान, अनेक प्रवासी बेपत्ता झाल्याची शक्यता असल्याने त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले.
#WATCH | Bihar | At least 11 dead after a boat capsized in the Raghopur Diara area of Vaishali district. Most of the deceased are minors who were traveling on the boat to attend the feast. District police officials and an SDRF team have been dispatched to conduct search operations
— ANI (@ANI) October 13, 2026
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) पथकालाही पाचारण करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णवाहिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नदीतील शोधमोहीम सुरू असून, बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यावर प्रशासनाचा भर आहे. मृतांची संख्या, जखमींची स्थिती आणि दुर्घटनेचे कारण याबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.




