मुंबई: मतदार यादीतील पात्र मतदारांची नोंदणी योग्य पद्धतीने व्हावी आणि अपात्र नावे वगळली जावीत, यासाठी निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रिया राबवली आहे. मात्र, या प्रक्रियेला विरोध करून बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. पात्र मतदारांना फॉर्म 6 भरून पुन्हा नोंदणी करण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ( Navnath Ban)
भाजप प्रदेश कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एसआयआर प्रक्रियेत 13 कोटी मतदार वगळल्याचा आरोप करून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचे बन म्हणाले. त्यांच्या दाव्यानुसार, या आकड्यात 6.30 कोटी कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, 2.8 कोटी मृत मतदार आणि 1.2 कोटी दुबार नोंदणी असलेल्या मतदारांचा समावेश आहे. उर्वरित सुमारे 3.1 कोटी मतदारांचा शोध लागलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा; दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या २६५ वरून ३०५ मुंबई : दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हातात ...
या मतदारांपैकी पात्र असलेल्यांना फॉर्म 6 च्या माध्यमातून पुन्हा नोंदणी करता येईल, असे बन यांनी नमूद केले. मात्र, 2002 च्या मतदार यादीत नाव नसलेल्या बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांना पुन्हा नोंदणी करता येणार नसल्याचा दावा त्यांनी केला. एसआयआर प्रक्रियेवरून विरोधक निवडणूक आयोगावर आरोप करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
विरोधकांवर नवनाथ बन यांची टीका
विरोधकांच्या आंदोलनावर टीका करताना बन यांनी राहुल गांधी, संजय राऊत आणि इतर विरोधी नेत्यांवर निशाणा साधला. दिल्लीत झालेल्या आंदोलनातील उपस्थितीवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजप आणि एनडीएकडे 300 हून अधिक खासदार असल्याचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सत्तेतून हटवण्याची विरोधकांची स्वप्ने पूर्ण होणार नाहीत, असे ते म्हणाले.
जंतर-मंतर परिसरातील नागरिकांना आंदोलनामुळे त्रास होत असल्याचा आरोप करत आंदोलकांसाठी रामलीला मैदानासह इतर पर्यायी मैदाने उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधकांच्या आंदोलनावर टीका करताना त्यांनी रामलीला मैदानाचा संदर्भ देत राजकीय टोलेबाजी केली.
विरोधकांना ‘काजवे’ म्हणत साधला निशाणा
निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारविरोधात आंदोलन करून विरोधक षड्यंत्र रचत असल्याचा आरोप बन यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना तेजस्वी सूर्याशी करत त्यांनी विरोधकांना काजव्यांची उपमा दिली. विरोधक कितीही प्रयत्न केले तरी मोदींचे राजकीय तेज कमी होणार नाही, असा दावा त्यांनी केला.