Jain Diksha Mahotsav : प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार; अहिंसा आणि जीवदयेचा विचार भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जैन दीक्षा महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; दुष्काळग्रस्तांना मदतीचे आवाहन, अनंत अंबानींच्या कार्याचेही केले कौतुक

मुंबई : भारतीय संस्कृती प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार देते. अहिंसा, त्याग, आत्मसंयम आणि जीवदया ही मूल्ये मानवतेला योग्य दिशा देणारी आहेत. केवळ माणसाचाच नव्हे, तर सृष्टीतील प्रत्येक जीवाच्या संरक्षणाचा विचार जैन धर्माने मांडला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे राष्ट्रसंत परमपूज्य नम्रमुनी महाराज यांच्या उपस्थितीत आयोजित जैन दीक्षा महोत्सवात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पाश्चात्त्य विचारधारा समर्थ तोच टिकेल, असा विचार मांडते. मात्र, भारतीय संस्कृती प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार देते आणि त्याच्या जगण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी समाजावर सोपवते. जैन धर्माने अहिंसा, सत्य, अपरिग्रह, आत्मसंयम आणि जीवदया या तत्त्वांच्या माध्यमातून या विचाराला अधिक व्यापक स्वरूप दिले आहे.


दीक्षा स्वीकारणाऱ्या दीक्षार्थींचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, दीक्षा घेण्याचा निर्णय घेणे आणि आयुष्यभर त्या व्रताचे पालन करणे अत्यंत कठीण असते. त्याग आणि आत्मसंयमाच्या माध्यमातून जीवनाला नवी दिशा देण्याचे सामर्थ्य जैन धर्मात आहे. जैन तीर्थंकरांनी दिलेला विचार केवळ वैयक्तिक कल्याणापुरता मर्यादित नसून संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा आहे. नम्रमुनी महाराज यांनी लाखो लोकांना अहिंसा, जीवदया आणि भूतदयेच्या मार्गावर आणण्याचे कार्य केले आहे. करुणा केवळ विचारांत न ठेवता ती प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची शिकवण त्यांनी दिली आहे. (Jain Diksha Mahotsav)



दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन


राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, अल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील मोठ्या भागाला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ही परिस्थिती नम्रमुनी महाराज यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने मदतीची तयारी दर्शवली. पशुधनासाठी चारा-पाणी, शेतकऱ्यांना मदत आणि नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष अभियान हाती घेतले आहे. या संकटाच्या काळात समाजातील प्रत्येक घटकाने मदतीसाठी पुढे येणे आवश्यक आहे. करुणा आणि जीवदयेचे विचार केवळ बोलण्यातून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून दाखविण्याची ही वेळ आहे. दुष्काळग्रस्त नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.






अनंत अंबानी खऱ्या अर्थाने करुणादूत – फडणवीस


दरम्यान, अनंत अंबानी यांना ‘करुणादूत’ पुरस्कार प्रदान केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी नम्रमुनी महाराज यांचे आभार मानले. अनंत अंबानी यांची प्राणिमात्रांविषयीची करुणा विलक्षण असून, माणसांप्रमाणेच प्राणी आणि पक्ष्यांनाही ते मित्र मानतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.


मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली अनंत अंबानी यांनी उद्योजक म्हणून ओळख निर्माण केली आहे. मात्र, त्यापलीकडे जाऊन त्यांनी भूतदयेच्या कार्याचे व्यापक मिशनमध्ये रूपांतर केले आहे. वनतारा हा त्यातून साकारलेला उल्लेखनीय प्रकल्प आहे. या प्रकल्पात प्राण्यांना निवारा, उपचार आणि प्रेम मिळत असून, नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्याचे कामही केले जात आहे.अनंत अंबानी यांची करुणा केवळ माणसांपुरती मर्यादित नसून प्रत्येक जीवापर्यंत पोहोचली आहे. या पुरस्कारामुळे त्यांना भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर कार्य करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


या महोत्सवाला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी सरन्यायाधीश भूषण गवई, उद्योजक मुकेश अंबानी, अनंत अंबानी, महापौर रितू तावडे यांच्यासह विविध संप्रदायांचे संत-महंत आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

Bharat Scouts and Guides : भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सदस्यसंख्या 5 कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट

Bharat Scouts and Guides: ‘भारत स्काउट्स अँड गाईड्स’ या संघटनेच्या 13 व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ST Bus Stand : राज्यातील एसटी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार ! जेजुरीच्या धर्तीवर उभारणार दुमजली प्रसाधनगृहे

ST Bus Stand : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील एसटी बसस्थानकांवर आता स्वच्छ आणि

Eknath Shinde : विनोद कांबळींच्या उपचारांसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार ! दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारणार

Eknath Shinde : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज

Prahaar Marathi News Live, 29 November 2026 :- भारतीय संघाचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, जुरेलचे शतक हुकलं

Prahaar Marathi News Live दिनांक 29 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,

'पाण्याचा एक थेंबही वाया घालवू नका!' पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा नागरिकांना संदेश

मुंबई : पर्यावरण संवर्धन ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचा

पुस्तकांच्या दुनियेत रमले मंत्री चंद्रकांत पाटील! वाचन संस्कृती वाढविण्यासाठी शासनाचे प्रयत्नशील; मंत्र्यांचे सुतोवाच

मुंबई: पुस्तक वाचनामुळे माणसाचे विचारविश्व समृद्ध होते, तसेच इतरांच्या अनुभवातून आणि विचारांतून शिकण्याची