Wednesday, October 14, 2026

Ulhasnagar murder : थरारक! उल्हासनगरमध्ये हरेश गिजवानी यांची गोळी झाडून हत्या; अवघ्या दोन तासांत पोलिसांची धडक कारवाई

अवघ्या दोन तासांत पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतले. अविनाश नायडू, नूर आलम खान आणि विजय पूरणसिंह ऊर्फ लेफ्टी अशी त्यांची नावे आहेत.

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मधील रेल्वे स्टेशन परिसरात बुधवारी रात्री गोळीबार करून हरेश गिजवानी यांची हत्या करण्यात आली. रात्री 8 ते 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी तपास सुरू केला. अवघ्या दोन तासांत पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतले. अविनाश नायडू, नूर आलम खान आणि विजय पूरणसिंह ऊर्फ लेफ्टी अशी त्यांची नावे आहेत.

जुन्या वैमनस्यातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज

प्राथमिक माहितीनुसार, 2021 मधील जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हल्लेखोरांनी हरेश गिजवानी यांच्यावर 2 ते 3 राऊंड गोळीबार केल्याची माहिती आहे. यातील एक गोळी त्यांच्या छातीत लागली. तसेच त्यांच्या पोटासह शरीराच्या इतर भागांवर शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचेही समोर आले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गिजवानी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन डीसीपी सचिन गोरे, एसीपी शंकर आवताडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू

पीएसआय रामदास मिसाळ, दिलीप चव्हाण, संतोष सांगळे, चंदू गायकवाड, सागर मोरे आणि डीबी पथकाने तपासात सहभाग घेतला. तांत्रिक माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी घटनेनंतर दोन तासांत 3 संशयितांना ताब्यात घेतले.

या घटनेमुळे उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येमागील नेमके कारण काय, 2021 मधील वैमनस्याचा या घटनेशी काय संबंध आहे आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत. प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >