
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेच्या मलजल प्रक्रिया केंद्राचे काम 63 टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामध्ये मेम्ब्रेन बायो रिऍक्टर (एमबीआर) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. प्रकल्पांतर्गत दररोज 500 दशलक्ष लीटर मलजलावर द्वितीय स्तरीय प्रक्रिया, तर त्यापैकी 250 दशलक्ष लीटर मलजलावर तृतीय स्तरीय प्रक्रिया केली जाणार आहे. यासोबतच वर्ग 'अ' स्तरापर्यंत गाळ प्रक्रिया करण्यात येणार असून, प्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या बायोगॅसपासून वीज निर्मितीही केली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासाठी 30 सप्टेंबर 2027 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
वरळी येथील या प्रकल्पाची पाहणी महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत या पाहणीवेळी उपायुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (मुंबई मलनि:सारण प्रकल्प) राजेंद्र परब तसेच संबंधित अभियंते आणि सल्लागार उपस्थित होते. यावेळी बांगर यांनी विविध प्रक्रिया टाक्या, इनलेट व आउटलेट व्यवस्था, पंप हाऊस, स्लज प्रक्रिया युनिट, अंतर्गत पाइपलाइन तसेच अन्य स्थापत्य कामांची स्थिती जाणून घेतली. याशिवाय पंप, एरेशन ब्लोअर्स, स्क्रीनिंग व स्लज प्रक्रिया यंत्रणा, विविध यांत्रिक उपकरणे आणि पाइपिंगच्या उभारणीची पाहणी केली. विद्युत अभियांत्रिकी कामांचाही त्यांनी आढावा घेतला.
मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एका उदंचन केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. हे केंद्र तातडीने कार्यान्वित करावे, अशी सूचना बांगर यांनी केली. तसेच, प्रकल्पस्थळी जुन्या इमारतींचे पाडकाम आणि नवीन इमारतींचे बांधकाम टप्प्याटप्प्याने करण्याऐवजी तांत्रिकदृष्ट्या शक्य असलेल्या ठिकाणी ही कामे समांतरपणे हाती घ्यावीत, असे बांगर यांनी स्पष्ट केले. पाडकाम, बांधकाम आणि अन्य संबंधित कामांचे योग्य नियोजन करून प्रकल्पाच्या कामाचा वेग वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
ऑक्टोबर ते मे या आठ महिन्यांच्या कालावधीत कामांचे नियोजन, मनुष्यबळाची उपलब्धता आणि आवश्यक साहित्याचा पुरवठा याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश बांगर यांनी दिले. सध्या प्रकल्पस्थळी दररोज सुमारे एक हजार मनुष्यबळ कार्यरत आहे. मात्र, प्रकल्प निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळात वाढ करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कामाच्या ठिकाणी गुणवत्ता, सुरक्षितता आणि कार्यक्षमता यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देशही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ...
समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता सुधारणार
मुंबईतील पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेकडून वरळी येथे या मलजल प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास आणि सागरी जीवनाच्या संवर्धनास मदत होणार आहे. तसेच फोर्ट, भायखळा, पेडर रोड, गावदेवी, हाजी अली, प्रभादेवी, दादर आणि वरळी परिसरातील नागरिकांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी कामांचा वेग, उपलब्ध मनुष्यबळ, साहित्य पुरवठा आणि विविध यंत्रणांमधील समन्वय यावर विशेष भर देण्यात येत आहे.
जुन्या केंद्राचे प्रचालन सुरूच
वरळी येथे सध्या अस्तित्वात असलेल्या मलजल प्रक्रिया केंद्रात मलजलावर स्क्रीनिंग आणि डिग्रिटिंग ही प्राथमिक प्रक्रिया केली जाते. त्यानंतर हे मलजल सागरी पातमुखाद्वारे खोल समुद्रात सोडले जाते. त्यामुळे समुद्रात विरळीकरण आणि विखुरण्याची प्रक्रिया घडून येते. नवीन प्रक्रिया केंद्राचे बांधकाम सुरू असतानाही अस्तित्वातील मलजल प्रक्रिया केंद्राचे प्रचालन आणि परिरक्षण सुरू ठेवण्यात आले आहे.




