Thursday, October 15, 2026

Ashish Shelar: दिवंगत नाना पाटेकरांना भाजपने दिली होती लोकसभा लढवण्याची ऑफर, मंत्री आशिष शेलार यांचा दावा

दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांना भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली होती

 देवेंद्र फडणवीसांसोबत स्वतः भेट घेतल्याची सांगितली आठवण

मुंबई : दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांना भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र, राजकारणात प्रवेश करण्यास नकार देताना नानांनी आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे मित्र म्हणून असलेले संबंध अडचणीत येऊ शकतात, असे सांगत ही विनंती नम्रपणे नाकारली होती. माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी नाना पाटेकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना हा किस्सा सांगितला.(ASHISH SHELAR)

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर मुंबईत आयोजित शोकसभेत शेलार बोलत होते. त्या वेळी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि मुंबई अध्यक्ष असलेले आपण नाना पाटेकर यांना भेटण्यासाठी गेलो होतो, अशी आठवण त्यांनी सांगितली. एका अभिनेत्याला लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी द्यावी, अशी चर्चा पक्षात सुरू होती. त्यानुसार फडणवीस आणि आपण नानांना निवडणूक लढवण्याची विनंती केली होती. मात्र, नानांनी लगेच उत्तर न देता दोघांना दुसऱ्या दिवशी दुपारनंतर वेळ आहे का, अशी विचारणा केली. त्यानंतर ठरलेल्या दिवशी घरी बोलावून जेवण झाल्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

“तुम्ही माझे मित्र आहात. तुम्हाला मी पचणार नाही रे. मला जे वाटते ते मी मोकळेपणाने बोलेन. तुम्ही माझे मित्र असल्यामुळे तुम्हाला अडचणीत आणेन. निवडणूक जिंकल्यानंतर मला जे आवश्यक वाटेल ते बोलल्यावर तुमची अडचण व्हावी, अशी माझी इच्छा नाही. तुम्ही तुमचं बघा,” अशा शब्दांत नानांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्याचे शेलार यांनी सांगितले. नानांनी आपला स्पष्टवक्तेपणा जपत मैत्रीही तितक्याच जिव्हाळ्याने टिकवली, असे ते म्हणाले.(NANA PATEKAR)

शेलार यांनी नानांशी १९९८ पासून असलेल्या परिचयाचाही उल्लेख केला. विद्यार्थी चळवळीत काम करताना नाटकांच्या स्पर्धेच्या निमित्ताने नानांची भेट झाली होती. त्या वेळी त्यांनी आमची खरडपट्टी काढल्याची आठवणही त्यांनी सांगितली. नानांचा आवाज कणखर आणि स्वभाव स्पष्टवक्तेपणाचा असला, तरी त्यांचे मन संवेदनशील होते. सामान्य माणसांच्या प्रश्नांबाबत त्यांना तळमळ होती, असे शेलार म्हणाले.

निधी देऊन जबाबदारी संपत नाही, तर प्रत्यक्ष काम पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे, अशी नानांची भूमिका होती. राज्य आणि देशाला गरज असताना आपल्या अनुभवाचा उपयोग करून घ्यावा, असे ते सांगत असत. त्यांच्या निधनाने सामाजिक कार्याची जाणीव असलेला संवेदनशील कलाकार गमावल्याची भावना शेलार यांनी व्यक्त केली. नानांनी सुरू केलेले सामाजिक कार्य पुढे नेण्यासाठी राज्य सरकार पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >