Friday, October 16, 2026

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

जेणेकरून बेस्ट बस सोबतच रिक्षा आणि टॅक्सी सेवाही उपलब्ध होईल आणि नागरिकांनाही मोठ्या विश्वासाने त्यातून प्रवास करेल. पर्यायाने बेस्ट उपक्रमाच्या महसूलात वाढ होवून तोट्यात चाललेली बेस्ट नफ्यात आणण्यास मदत होईल,असे नमुद केले आहे.

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी महत्वपूर्ण सूचना केली आहे. बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी तसेच मुंबईकरांना सर्वसमावेशक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून बेस्ट उपक्रमामार्फत ‘बेस्ट रिक्षा’ व ‘बेस्ट टॅक्सी’ सेवा सुरू करण्याबाबत स्वतंत्र अभ्यास करून त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही केली जावी अशी मागणी केली आहे. जेणेकरून बेस्ट बस सोबतच रिक्षा आणि टॅक्सी सेवाही उपलब्ध होईल आणि नागरिकांनाही मोठ्या विश्वासाने त्यातून प्रवास करेल. पर्यायाने बेस्ट उपक्रमाच्या महसूलात वाढ होवून तोट्यात चाललेली बेस्ट नफ्यात आणण्यास मदत होईल,असे नमुद केले आहे.

भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी महापालिकेत ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केली. मुंबईकरांना परवडणाऱ्या दरात सुरक्षित, विश्वासार्ह आणि नियमित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात बेस्टची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तथापि, वाढता संचालन खर्च, इंधन व देखभाल खर्च, कर्मचाऱ्यांवरील खर्च तसेच सार्वजनिक वाहतूक सेवेतील आर्थिक तूट यामुळे बेस्ट उपक्रमावर आर्थिक भार वाढत आहे.

ही तुट भरुन काढण्यासाठी बेस्टला आपल्या पारंपारिक पध्दतीत बदल करून काळानुरुप बदलण्याची गरज आहे. मुंबईतील मेट्रो, रेल्वे, बेस्ट बस आदी विविध सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करणाऱ्या प्रवाशांना स्थानकापासून त्यांच्या घरापर्यंत किंवा गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ची आवश्यकता असते.

सध्या ही गरज मोठ्या प्रमाणावर खासगी रिक्षा व टॅक्सी सेवांद्वारे पूर्ण केली जाते. बेस्ट उपक्रमाकडे मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर प्रवासीवर्ग, बस आगार, बस स्थानके, वाहतूक व्यवस्थापनाचा अनुभव तसेच नागरिकांचा विश्वास यांचा मोठा आधार आहे. या पायाभूत क्षमतेचा उपयोग करून बेस्टच्या माध्यमातून ‘बेस्ट ऑटो’ आणि ‘बेस्ट टॅक्सी’ या नावाने अधिकृत रिक्षा व टॅक्सी सेवा सुरू केल्यास प्रवाशांना एकात्मिक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच बेस्टच्या उत्पन्नाचे नवीन साधन निर्माण होऊ शकते.त्यामुळे ही मागणी प्रकाश गंगाधरे यांनी केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >