मुंबई : सर्वोच्च न्यायालयाची माफी मागण्याच्या मुद्द्यावरून भाजपने उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांच्यानंतर आता संजय राऊतही माफी मागण्याची परंपरा पुढे चालवत असल्याचा टोला भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला. न्यायालयाची माफी मागण्याबरोबरच जनतेची दिशाभूल केल्याबद्दल राऊत यांनी महाराष्ट्रातील १४ कोटी आणि देशातील १४० कोटी जनतेचीही माफी मागावी, अशी मागणी बन यांनी शुक्रवारी केली.
राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयात न्याय मागताना पालघरमधील साधू हत्याकांड, दिशा सालियान मृत्यू प्रकरण, पत्राचाळ प्रकरण आणि न्यायासाठी प्रयत्न करणाऱ्या संबंधित कुटुंबांच्या मुद्द्यांवरही भूमिका मांडावी, असे आव्हान बन यांनी दिले. मतदारयादीतील १३ कोटी मतदार वगळल्याच्या दाव्यावरूनही बन यांनी राऊत आणि राहुल गांधी यांना लक्ष्य केले. हा आकडा दिशाभूल करणारा असल्याचे सांगत, त्यातील जवळपास १० कोटी नोंदी दुबार मतदार, मृत व्यक्ती किंवा स्थलांतरित झालेल्यांशी संबंधित असल्याचे ते म्हणाले. उर्वरित सुमारे तीन कोटी नोंदींबाबत संभ्रम आहे. मतदारयादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना ‘फॉर्म ६’ भरून नाव नोंदवता येते, असे सांगत त्यांनी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेचे समर्थन केले. विरोधकांना दुबार मतदार आणि बांगलादेशी घुसखोरांची नावे मतदारयादीत कायम ठेवायची असल्याचा आरोपही बन यांनी केला.
मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘महागणेशोत्सव : महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ अंतर्गत आयोजित ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट ...
स्वतःच्या पक्षातील नेते आणि कार्यकर्ते सांभाळता येत नसताना निवडणूक आयोगाला जबाबदार धरणे योग्य नसल्याची टीका बन यांनी केली. आधी पक्षातील अंतर्गत प्रश्न सोडवावेत आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करावेत, असे ते म्हणाले. दरम्यान, तिरंगा रॅली आयोजित करणाऱ्या सीजेपीवरही बन यांनी टीका केली. देशात बांगलादेश किंवा नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करायची आहे का, असा सवाल त्यांनी केला. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ‘रिजीम चेंज’ अर्थात सत्तापालटाबाबत केलेल्या विधानाचा संदर्भ देत, विरोधकांना संविधान, सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि जनतेने निवडून दिलेले सरकार नको असल्याचा आरोप त्यांनी केला. तिरंगा रॅली काढण्यास विरोध नसला, तरी ती देश वाचवण्यासाठी असावी, देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी नव्हे, असे बन म्हणाले.