Friday, October 16, 2026

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबईतील गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी BMC कडून कारवाई सुरू आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मुलुंडच्या अमर नगर परिसरातील आणखी २१५ बांधकामे हटवण्यात आली आहेत.

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गोरेगाव - मुलुंड जोडरस्ते प्रकल्पात बाधित होणारी अमर नगर येथील २१५ बांधकामे हटविण्याची कारवाई टी विभागामार्फत शुक्रवारी १६ ऑक्टोबर २०२६ पूर्ण करण्यात आली. या कारवाईमुळे टी विभागाच्या हद्दीतील गोरेगाव - मुलुंड जोडरस्त्याचा बहुतांश मार्ग मोकळा झाला असून, प्रकल्पाच्या कामाला गती मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. गोरेगाव - मुलुंड जोड रस्त्याची लांबी १२.२० किलोमीटर आहे. या जोडरस्त्याचे काम चार टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यात रस्ता, भूमिगत बोगदा, उड्डाणपूल आदी कामाचा समावेश आहे. टी विभागाच्या हद्दीत अमर नगर येथील सुमारे ६०४ बांधकामे जोडमार्गाच्या उभारणीमुळे बाधित होणार होती. या बाधित बांधकामांचे दोन टप्‍प्‍यात हटण्याचा निर्णय घेण्‍यात आला. त्‍यानुसार, पहिल्या टप्प्यात म्‍हणजेच, ३१ मे २०२६ पर्यंत एकूण ३८९ बांधकामे हटवण्यात आली आहेत. तर, दुसऱ्या टप्प्यात म्‍हणजेच शुक्रवारी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी जोडमार्गाने बाधित होणा-या आणखी २१५ बांधकामे हटवण्यात करण्यात आले आहे. यामध्ये निवासी, व्यावसायिक बांधकामांचा समावेश असून पात्र आणि अपात्र अशा दोन्ही प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे.

उप आयुक्त (परिमंडळ ६) संतोष धोंडे मार्गदर्शनाखाली आणि टी विभागाच्‍या सहायक आयुक्त योगिता कोल्हे यांच्‍या नेतृत्‍वाखाली ही मोहीम राबविण्‍यात आली. महानगरपालिकेचे ३० पेक्षा अधिक अभियंते, ५० कर्मचारी यांच्या सोबत ४ पोकलेन संयंत्र, ४ जेसीबी संयंत्र, १० डंपर आदींच्या सहाय्याने ही सर्व बाधित बांधकामे हटविण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्‍त तैनात होता. टी विभागाच्या हद्दीतील गोरेगाव - मुलुंड जोड रस्त्याने बाधित होणारी ६०४ बांधकामे आता हटवण्यात आली आहे. यामुळे गोरेगाव - मुलुंड जोडरस्त्याच्या विकसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ही बांधकामे हटवण्याची कारवाई पूर्ण झाली असून, सध्या बांधकामाचा राडारोडा हटविण्याचे काम सुरू आहे. राडारोडा हटविल्यानंतर प्रकल्पाच्या पुढील कामांसाठी जागा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >