Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणातील आरोपी विजय खैरनार (वय २४) याला जलदगती न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती के. जी. पालदेवार यांनी हा निकाल दिला. या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव न्यायालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
३० सप्टेंबरला आरोपी ठरला होता दोषी
या प्रकरणात न्यायालयाने ३० सप्टेंबर रोजी विजय खैरनार याला अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्या या आरोपांखाली दोषी ठरवले होते. त्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या अंतिम सुनावणीनंतर न्यायालयाने शिक्षेबाबतचा निर्णय राखून ठेवला होता. अखेर न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून, अपहरण आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रत्येकी सात वर्षांचा सश्रम कारावास आणि दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती आहे.
Nashik Crime : नाशिकमध्ये एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटक करून तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा ...
१६ नोव्हेंबर रोजी घडली होती घटना
गेल्या वर्षी १६ नोव्हेंबर रोजी डोंगराळे गावातून साडेचार वर्षांच्या बालिकेचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास वेगाने पूर्ण केला. अवघ्या काही तासांत गावातीलच विजय खैरनार याला अटक करण्यात आली. त्यानंतर तीन आठवड्यांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. गेल्या सुमारे ११ महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात सुरू होती.
उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
या खटल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू मांडताना त्यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. संजय सोनवणे, ॲड. स्नेहा शर्मा-ठाकरे आणि ॲड. हर्षल तिवारी यांनी सहकार्य केले. या खटल्यात सरकारी पक्षाकडून एकूण २४ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीला अटक झाल्यापासून तो कारागृहात होता. सुरक्षेच्या कारणास्तव सुनावणीच्या वेळी त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात येत होते. अंतिम निकालाच्या दिवशीही हीच प्रक्रिया अवलंबण्यात आली.
निकालाच्या दिवशी न्यायालय परिसरात गर्दी
निकाल ऐकण्यासाठी मालेगाव न्यायालय परिसरात सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. संभाव्य गर्दी आणि कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे निकालाच्या वेळी न्यायालयात उपस्थित होते. या प्रकरणातील निकालामुळे डोंगराळे येथील बालिकेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मात्र, फौजदारी खटल्यात शिक्षेच्या अंमलबजावणीची पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि अपीलसंबंधी बाबी स्वतंत्रपणे लागू होऊ शकतात.