
Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून सिंहस्थ पर्वाला सुरुवात होणार असून, त्यानिमित्त शहरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांसाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन नाशिक शहर पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी गोदाकाठ परिसरात पोलिसांकडून पाहणी करण्यात आली, तसेच बंदोबस्ताच्या ठिकाणांची निश्चिती करण्यासाठी रंगीत तालीम घेण्यात आली.
गोदाकाठ परिसरातील सुरक्षेचा आढावा
गोदाकाठावर होणारा सिंहस्थ कुंभमेळा भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्याने गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि भाविकांची सुरक्षितता यांना विशेष महत्त्व आहे. कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी शासन आणि प्रशासनाकडून विविध स्तरांवर नियोजन केले जात आहे. ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नाशिक पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. गुरुवारी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी पोलिसांनी रंगीत तालीम करून बंदोबस्ताचे नियोजन तपासले. यामध्ये गर्दी नियंत्रण, वाहतुकीचे नियोजन, पोलिसांमधील समन्वय आणि आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांची चाचणी घेण्यात आली.
Nashik Kumbh Mela : : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरीतील कुशावर्त तीर्थ येथे ३१ फूट उंच भव्य सिंहस्थ ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. ...
पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार ध्वजारोहण सोहळ्यासाठी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येत आहे. या रंगीत तालीममध्ये चार पोलीस उपायुक्त, सात सहायक पोलीस आयुक्त, १४ वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सुमारे ३०० ते ४०० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. याशिवाय बॉम्ब शोधक पथक आणि इतर संबंधित पथकांचाही सहभाग होता. या सरावादरम्यान विविध ठिकाणांवरील बंदोबस्त, वाहतुकीचे मार्ग, महत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमनाची व्यवस्था आणि नगर प्रदक्षिणेच्या मार्गाची पाहणी करण्यात आली. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून सर्व यंत्रणांमध्ये योग्य समन्वय राखण्यावर भर देण्यात आला.
रामकुंड, भाजी बाजार परिसरात विशेष पाहणी
गुरुवारी सकाळी मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गोदाकाठ परिसरात दाखल झाले होते. त्यामुळे परिसरात पोलीस बंदोबस्ताचे चित्र पाहायला मिळाले. रामकुंड परिसर, भाजी बाजार पटांगण तसेच गोदा आरतीच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करण्यात आली. धर्मध्वज शोभायात्रा ज्या मार्गावरून जाणार आहे, त्या संपूर्ण मार्गाचीही प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली.
अंतिम नियोजनासाठी आणखी पाहणी
या रंगीत तालीममध्ये प्राथमिक स्वरूपात सुरक्षा व्यवस्थेची चाचणी घेण्यात आली. यानंतर आणखी दोन वेळा पाहणी करून बंदोबस्ताचे अंतिम नियोजन निश्चित करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली. ध्वजारोहण सोहळा शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, तसेच भाविकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.






