Saturday, October 17, 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डी. लिट. प्रदान

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावंगी मेघे (वर्धा) येथील अदानी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (एआयएचईआर) या अभिमत विद्यापीठाच्या १७ व्या दीक्षान्त समारंभात मानद डी. लिट. पदवी प्रदान करण्यात आली. या सोहळ्यात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे (एनएमसी) अध्यक्ष डॉ. अभिजात शेठ यांनाही वैद्यकीय शिक्षण, आरोग्य व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (डी.एस्सी.) पदवीने गौरविण्यात आले. विद्यापीठाच्या नावात बदल झाल्यानंतरचा हा पहिलाच दीक्षान्त समारंभ होता.

या समारंभाला मुख्यमंत्री फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एआयएचईआरच्या कुलपती आणि अदानी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदानी अध्यक्षस्थानी होत्या. राज्यमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांचीही विशेष उपस्थिती होती. यापूर्वी दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (डीएमआयएचईआर) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्थेचे नामकरण एआयएचईआर असे करण्यात आले आहे. दीक्षान्त समारंभात १० विद्याशाखांमधील एकूण २ हजार ३२० विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. वैद्यकीय, दंतवैद्यक, आयुर्वेद, फिजिओथेरपी, नर्सिंग आणि अभियांत्रिकी यांसह विविध शाखांतील विद्यार्थ्यांचा त्यात समावेश होता. यामध्ये १२३ पीएच.डी. पदव्यांचा समावेश आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी १२३ सुवर्णपदके, सात रौप्यपदके आणि १३ अन्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. दत्ता मेघे मेडिकल कॉलेजचे पूजल देविदास मापारी यांना उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल तब्बल २३ पदकांनी सन्मानित करण्यात आले.

पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे ८० टक्के मुली असल्याचे सांगत, देशाची ओळख घडविण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मेघे समूहाच्या नेतृत्वाखाली देशात नाव कमावलेल्या या संस्थेची अदानी समूहाच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर वाटचाल होईल. नागपूर आणि वर्धा येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अदानी समूह एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, मानद पदवी स्वीकारताना, “अभ्यास न करता मला डॉक्टर होता आले, याबद्दल विद्यापीठाचे आभार,” अशी मिश्कील प्रतिक्रिया फडणवीस यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >