Saturday, October 17, 2026

MMRDA News: ठाण्यातील कोपरी पुलावर मोठी दुर्घटना! सळईचा सांगाडा कोसळला, कंत्राटदाराला MMRDA ने ठोठावला 2 कोटींचा दंड

Thane MMRDA News: ठाण्यातील कोपरी पुलावर बांधकामातील लोखंडी सळ्यांचा सांगाडा कारवर कोसळला आहे. घटनेमध्ये कारचे नुकसान झाले असून, MMRDA ने कंत्राटदाराला कोट्यवधींचा दंड ठोठावून चौकशीचे आदेश दिले आहेत.

ठाणे: ठाण्यातील आनंद नगर- साकेत उन्नत मार्ग प्रकल्पाच्या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली आहे. ठाणे- मुंबई एन्ट्री पॉईंट समजल्या जाणाऱ्या कोपरी पुलावरून जात असताना आज (शनिवारी- 17 ऑक्टोबर) दुपारी एका कारवर बांधकाम सुरू असलेल्या खांबाचा लोखंडी सळ्यांचा सांगाडा (रिइन्फोर्समेंट केज) कोसळल्यामुळे कारच्या पुढील काचेचे नुकसान झाले. घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण, कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संबंधित घटनेनंतर बांधकामाच्या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर MMRDA कडून घटनेची गंभीर दखल घेत संबंधित कंत्राटदारावर तब्बल दोन कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे. शिवाय, या घडलेल्या घटनेबाबत MMRDA ने निवेदन सुद्धा सादर केले आहे.

आनंद नगर–साकेत उन्नत मार्ग प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या दुर्दैवी घटनेमध्ये दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.MMRDA ने दिलेल्या निवेदनामध्ये, कोणालाही दुखापत झालेली नाही. MMRDA कडून घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अशा घटना कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत. बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. नुकसानग्रस्त वाहन घटनास्थळावरून हटविण्यात आले असून, कोसळलेला लोखंडी सांगाडा क्रेनच्या साहाय्याने सुरक्षितपणे हटविण्याचे काम सुरू आहे. घटनेप्रकरणी MMRDA ने प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर दंड ठोठावत चौकशीचे आदेश दिलेय. शिवाय, घटनेचे नेमके कारण आणि सुरक्षाविषयक त्रुटींचा शोध घेण्यासाठी सखोल चौकशीचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सुधारात्मक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल.

 
 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

नागरिकांची सुरक्षितता ही MMRDA ची सर्वोच्च प्राथमिकता असून, प्रत्येक प्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन आणि जबाबदारी निश्चित केली जाईल, अशी माहिती सुद्धा MMRDA ने आपल्या निवेदनात दिली आहे. दरम्यान, लोखंडी सळ्यांचा सांगाडा कसा काय कोसळला? बांधकामाच्या ठिकाणी MMRDA कडून कोणत्या सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या? काही त्रुटी होत्या का ? पुन्हा या अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, या दृष्टीने MMRDA ने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवाय, MMRDA ने आपल्या निवेदनामध्ये कंत्राटदाराला, नागरिकांची सुरक्षितता ही प्राधिकरणाची प्राथमिकता असून बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असं खडसावून सांगितले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >