जगभरात कोट्यवधी लोकांच्या मोबाईलमध्ये अतिशय लोकप्रिय असलेले' लोकप्रिय मेसेजिंग ॲप 'व्हॉट्सॲप'बाबत (WhatsApp) एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. गुगल प्ले स्टोअरच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, कारण प्ले स्टोअरवर (Play Store) हुबेहूब खऱ्यासारखाच दिसणारा व्हॉट्सॲपचा एक बनावट (Fake) ॲप लिस्ट झाल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, या बनावट ॲपला आतापर्यंत पाच लाखांहून अधिक युजर्सनी डाउनलोड देखील केले आहे, ज्यामुळे मोठी फसवणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशी उघडकीस आली बोगस ॲपची पोलखोल
'अँड्रॉइड ऑथॉरिटी'ने प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी प्ले स्टोअरवर एक बनावट गुगल क्रोम ॲप आढळले होते, ज्याला लाखो लोकांनी डाउनलोड केले होते. आता अगदी तशाच पद्धतीने व्हॉट्सॲपचा बनावट अवतार समोर आला आहे. या बोगस ॲपचा आकार (Size) ४२ एमबी असून, डेव्हलपरने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी याला 'स्पॉन्सर्ड सजेशन' म्हणून बूस्ट केले होते. परिणामी, अनेक साध्या भोळ्या युजर्सनी हे खोटे ॲप खरे समजून आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल केले.
अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (FDA) शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) मुलुंड येथील फोर्टिस रुग्नालयातील स्वयंपाक घराचा परवाना निलंबित केला आहे. फोर्टिस ...
कोण आहे यामागचा डेव्हलपर ?
मूळ आणि अधिकृत व्हॉट्सॲप हे नेहमी 'WhatsApp LLC' या अधिकृत डेव्हलपरच्या नावाखाली प्ले स्टोअरवर उपलब्ध असते. मात्र, या बनावट ॲपची निर्मिती 'Agment Assets sallu' नावाच्या संशयास्पद डेव्हलपरने केली आहे. फसवणूक करण्यासाठी या भामट्यांनी अधिकृत व्हॉट्सॲपचेच डिस्क्रिप्शन आणि स्क्रीनशॉट जसेच्या तसे कॉपी केले आहेत. इतकेच नाही तर, युजर्सचे रिव्ह्यू आणि तक्रारी टाळण्यासाठी गुगल प्लेच्या 'अर्ली ॲक्सेस' (Early Access) फिचरचा चुकीचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
युजर्ससाठी महत्त्वाची खबरदारी
जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीच्या कोणी व्यक्तीने अलीकडेच प्ले स्टोअरवरून नवीन व्हॉट्सॲप डाउनलोड केले असेल, तर तातडीने तपासा की तो अधिकृत ॲप आहे की नाही. प्ले स्टोअरवर थेट 'व्हॉट्सॲप मेसेंजर' सर्च करताना हे फेक ॲप थेट वरती दिसत नसले, तरीही अशा बोगस ॲप्समुळे सायबर सुरक्षेचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणत्याही अज्ञात किंवा बोगस ॲप्स डाउनलोड करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन तंत्रज्ञान तज्ज्ञांकडून केले जात आहे.