Saturday, October 17, 2026

पनवेलमध्ये पहिली नागरी बस सेवा सुरू होणार, २८८ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी

पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुलभ आणि नागरिकांच्या गरजांनुसार विकसित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिकेने पहिल्या टप्प्यात १६ मार्गांवर १०० ते १३० बसेस सुरु करण्यासाठी २८७.५५ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली आहे. वेगाने विस्तारणाऱ्या या नागरी क्षेत्रात कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी प्रस्तावित नेटवर्कमध्ये ६८ बस थांबे, पाच डेपो, ७६ चार्जिंग स्टेशन्स आणि एक इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम असेल.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वतःच्या मालकीची परिवहन सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, पुढील कार्यवाहीसाठी विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पनवेलमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने पाऊल पडले असून नागरिकांना सुलभ, सोयीस्कर आणि सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना गती मिळणार आहे. महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत शहराच्या विकासाशी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून या ठरावाला मंजुरी देण्यात आली.

नियोजित मार्ग जुने पनवेल, सिडको विकसित नोड्स, रेल्वे स्थानके आणि गावे यांना जोडतील, ज्यात मर्यादित सार्वजनिक वाहतूक असलेल्या भागांचाही समावेश आहे. अंदाजित खर्चात १०० बसेससाठी १५० कोटी रुपये, ६८ बस थांब्यांसाठी ८.१५ कोटी रुपये, डेपोंसाठी ३० कोटी रुपये, चार्जिंग स्टेशनसाठी ८.४ कोटी रुपये आणि इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमची ८६ कोटी रुपयांचा समावेश आहे. प्रवाशांना सेवेबद्दल माहिती मिळविण्यात मदत करण्यासाठी एक मोबाईल ॲप्लिकेशन देखील प्रस्तावित आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल आणि अंमलबजावणी आराखडा तयार करण्यासाठी अर्बन मास ट्रान्झिट कंपनी लिमिटेडची नियुक्ती करण्यात आली आहे. या सल्लागार कराराचे मूल्य ३.१७ कोटी रुपये असून त्याचा कालावधी ५४५ दिवसांचा आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून अनुदानासाठी पाठपुरावा करण्यात येईल, तसेच या सेवेमुळे पानवेलकरांना सुरक्षित, नियमित आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास महापौर नीतील पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >