Saturday, October 17, 2026

Nashik TCS Case : निदा खानच्या वैवाहिक आयुष्यात वादळ ! पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, कौटुंबिक न्यायालयात समुपदेशन

Nashik TCS Case : नाशिक टीसीएस कंपनीशी संबंधित कथित धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या निदा एजाज खान हिच्या वैयक्तिक आयुष्यातही तणाव निर्माण झाल्याचे वृत्त आहे. तिच्या पतीने नाशिकरोड कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या पहिल्या सुनावणीदरम्यान दोघांचेही न्यायालयाच्या मध्यस्थी केंद्रात समुपदेशन करण्यात आले. निदा खान (वय २६) हिच्याविरोधात देवळाली कॅम्प आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या स्वतंत्र गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण चर्चेत आहे. संबंधित प्रकरणांतील आरोपांमुळे वैवाहिक नात्यात तणाव निर्माण झाल्याचे वृत्त आहे.

पतीकडून घटस्फोटाची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, निदा खानच्या पतीने वैवाहिक नाते संपवण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, निदा खान ही वैवाहिक नाते टिकवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात गरोदरपण आणि कौटुंबिक तणावाची पार्श्वभूमीही चर्चेत आली आहे. निदा खान हिच्यातर्फे ॲड. शोभा ताजनपुरे आणि ॲड. प्रकाश ताजनपुरे हे बाजू मांडत आहेत, तर तिच्या पतीच्या वतीने ॲड. नितीन पंडित काम पाहत आहेत.

कौटुंबिक न्यायालयात समुपदेशन

घटस्फोटाच्या अर्जावरील पहिल्या सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांचे समुपदेशन करण्यात आले. वैवाहिक नात्यातील मतभेद दूर करण्यासाठी मध्यस्थीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रकरणात २० नोव्हेंबर रोजी पुन्हा समुपदेशन होणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर न्यायालय पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेईल.

दोन स्वतंत्र गुन्ह्यांमुळे निदा खान चर्चेत

उपलब्ध माहितीनुसार, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात एका तरुणीशी संबंधित कथित धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणी दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान, एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल आणि हानिफ शेख यांची नावे समोर आली आहेत. तसेच, मुंबई नाका पोलीस ठाण्यात त्याच कंपनीतील एका तरुणाशी संबंधित कथित धर्मांतर आणि फसवणूक प्रकरणात तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन आणि निदा खान यांची नावे संशयित म्हणून नोंदवण्यात आल्याचे वृत्त आहे.या प्रकरणात निदा खान पसार असताना मतीन पटेल याने तिला हानिफ शेख याच्या घरी आश्रय दिल्याचा आरोपही करण्यात आला होता.

दोन्ही प्रकरणांत सशर्त जामीन

या दोन्ही प्रकरणांमध्ये निदा खान हिला नाशिकरोड आणि नाशिक जिल्हा न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर झाल्याची माहिती आहे. त्यामुळे एका बाजूला संबंधित गुन्ह्यांमधील कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे तिच्या घटस्फोटाच्या अर्जामुळे कौटुंबिक न्यायालयातील प्रकरणाकडेही लक्ष लागले आहे. आता २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुढील समुपदेशनात काय घडते आणि वैवाहिक नात्याबाबत दोन्ही पक्ष कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >