नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पायाभूत सुविधा उभारण्याच्या कामांना वेग देण्यात येत आहे. कुंभमेळ्यासाठी दाखल होणाऱ्या लाखो भाविकांची संभाव्य गर्दी, वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, साधुग्रामची उभारणी आणि घाट विकास या महत्त्वाच्या विषयांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश पालक सचिव तथा जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी दिले.
शनिवारी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणात झालेल्या या बैठकीला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन
कुंभमेळ्यादरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पार्किंग व्यवस्थेचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तावित पार्किंग स्थळे, वाहनांची क्षमता, प्रवेश आणि निर्गमन मार्ग तसेच वाहतुकीचे नियोजन यांचा आढावा घेण्यात आला.भाविकांना पार्किंगची ठिकाणे, प्रमुख रस्ते आणि आवश्यक सुविधांची माहिती सहज मिळावी, यासाठी दिशादर्शक फलक उभारण्यावरही चर्चा झाली. फलकांची ठिकाणे, रचना आणि अंमलबजावणी यांचे नियोजन प्रभावीपणे करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.
साधुग्राममध्ये मूलभूत सुविधांवर भर
सिंहस्थ कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या साधू-महंतांच्या निवासासाठी साधुग्रामची उभारणी महत्त्वाची आहे. यासाठी नियोजित जागा, अंतर्गत रस्ते आणि नागरी सुविधांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.साधुग्राम परिसरात पाणीपुरवठा, स्वच्छता, वीजपुरवठा, प्रकाशव्यवस्था आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्रित नियोजन करावे, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या कामांमध्ये समन्वयाचा अभाव राहू नये आणि निर्धारित वेळेत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यावर विशेष भर देण्यात आला.
Nashik Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि ३१ ऑक्टोबर रोजी होणारा राष्ट्रपतींचा नाशिक दौरा लक्षात घेता शहर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने विशेष मोहीम हाती ...
घाट विकास आणि भाविकांच्या सुरक्षिततेवर लक्ष
कुंभमेळ्याच्या काळात घाट परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता घाट विकासाच्या कामांनाही प्राधान्य देण्यात येत आहे. घाटांचे प्रस्तावित आराखडे, प्रवेशमार्ग, भाविकांची ये-जा, गर्दीचे व्यवस्थापन, सुरक्षितता आणि प्रकाशव्यवस्था यांसह विविध बाबींवर बैठकीत चर्चा झाली. घाट परिसरातील कामे करताना भाविकांच्या सोयी आणि सुरक्षिततेचा विचार करून पूरक नागरी सुविधांचे नियोजन करण्याची आवश्यकता अधिकाऱ्यांनी अधोरेखित केली.
प्रलंबित कामे आणि मान्यता वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
कुंभमेळ्याच्या तयारीसाठी विविध विभागांकडून सुरू असलेल्या कामांमध्ये सुसूत्रता राखणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाने कामांची सद्यःस्थिती, प्रलंबित मान्यता, तांत्रिक अडचणी आणि कामांचे वेळापत्रक यांची अद्ययावत माहिती ठेवावी, असे निर्देश एकनाथ डवले यांनी दिले. विविध यंत्रणांशी संबंधित विषयांवर निर्णय घेण्यास विलंब होऊ नये, यासाठी आवश्यक पाठपुरावा करावा. तसेच प्रलंबित प्रश्न समन्वयाने सोडवून पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग कायम ठेवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्व यंत्रणांच्या समन्वयातून कुंभमेळ्याची तयारी
कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनीही विविध विभागांमधील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. पायाभूत सुविधा, वाहतूक, वीज, पाणीपुरवठा आणि भाविकांसाठीच्या नागरी सुविधा या एकमेकांशी संबंधित असल्याने सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी कुंभमेळा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा, महापालिका, त्र्यंबकेश्वर नगर परिषद आणि विविध पायाभूत सुविधा उभारणाऱ्या संस्थांमध्ये समन्वय साधला जात आहे.
भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि नियोजनबद्ध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पार्किंग, साधुग्राम, घाट विकास आणि वाहतूक व्यवस्थेच्या कामांचा नियमित आढावा घेण्यावर प्रशासनाचा भर आहे.