Saturday, October 17, 2026

Sita As A Warrior : 'रामायण' चित्रपटाच्या नव्या प्रोमोत साई पल्लवीचा धडाकेबाज ॲक्शन अवतार; प्रेक्षकांनी मानले दिग्दर्शकाचे आभार

निर्माते या चित्रपटाच्या प्रसारासाठी (प्रमोशन) कोणतीही कसर सोडताना दिसत नाहीत. शनिवारी निर्मात्यांनी एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर, निर्माते नमित मल्होत्रा आणि दिग्दर्शक नितेश तिवारी चित्रपटाबद्दल चर्चा करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये चित्रपटातील काही खास दृश्ये दाखवण्यात आली असून, त्यातील साई पल्लवीचे ॲक्शन सीन्स सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

मुंबई : रणबीर कपूर, (Ranbir Kapoor) यश (Yash) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांची प्रमुख भूमिका असलेला 'रामायण' (Ramayan) हा चित्रपट सध्या वर्षातील सर्वात बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक ठरला आहे. निर्माते या चित्रपटाच्या प्रसारासाठी (प्रमोशन) कोणतीही कसर सोडताना दिसत नाहीत. शनिवारी निर्मात्यांनी एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर, निर्माते नमित मल्होत्रा आणि दिग्दर्शक नितेश तिवारी चित्रपटाबद्दल चर्चा करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये चित्रपटातील काही खास दृश्ये दाखवण्यात आली असून, त्यातील साई पल्लवीचे ॲक्शन सीन्स सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

'योद्धा सीता' अवताराने जिंकली चाहत्यांची मने

चित्रपटाचा हा नवीन प्रोमो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. या चित्रपटात माता सीतेची भूमिका एका 'योद्धा राणी'च्या स्वरूपात दाखवली जाणार असल्याने प्रेक्षक खूप प्रभावित झाले आहेत. एका युजरने सोशल मीडियावर लिहिले, "चित्रपटात योद्धा सीता पाहायला मिळणे ही अप्रतिम गोष्ट आहे. आतापर्यंत कोणत्याही भारतीय दिग्दर्शकाने सीतेचे हे रूप दाखवण्याचा प्रयत्न केला नव्हता. नितेश तिवारी यांनी रामायण चित्रपटात खरोखरच कौतुकास्पद काम केले आहे." दुसऱ्या एका युजरने लिहिले, "माता सीतेचा हा शक्तिशाली अवतार खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे!" तर आणखी एका चाहत्याने कमेंट केली, "अखेर सीतेला एका योद्ध्याच्या रूपात पाहण्याची संधी मिळत आहे. नितेश तिवारी यांनी दाखवलेले हे रूप भारतीय चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक ठरेल."

ट्रेलरला मिळाला जबरदस्त प्रतिसाद

'रामायण' चित्रपटाचा पहिला ट्रेलर यापूर्वी जुलै महिन्यात प्रदर्शित करण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी प्रेक्षकांना आणखी काहीतरी भव्य पाहण्याची उत्सुकता होती. हीच उत्सुकता लक्षात घेत दोन दिवसांपूर्वी चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या दुसऱ्या ट्रेलरमधील नेत्रदीपक दृश्ये पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत. या ट्रेलमध्ये रणबीर आणि सई पल्लवी यांचा अभिनय उत्तम होताच, पण रावणाच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेता 'यश' याने आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकून घेतली.

चित्रपट कधी होणार रिलीज ?

हा भव्य चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा 'पहिला भाग' ५ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल, तर 'दुसरा भाग' पुढील वर्षी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर रिलीज करण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे, ५ नोव्हेंबरच्या अधिकृत रिलीजच्या आदल्या दिवशी म्हणजेच ४ नोव्हेंबरला या चित्रपटाचे सुमारे ३०० 'पेड प्रिव्ह्यू शो' (खास खेळ) आयोजित केले जाणार असल्याचे समजते. सध्याच्या काळात अशा मोठ्या चित्रपटांचे आदल्या दिवशी दाखवले जाणारे शो तुफान कमाई करतात आणि प्रेक्षकांमध्येही याबाबत प्रचंड उत्सुकता असते. त्यामुळे 'रामायण' चित्रपटाचे हे सुरुवातीचे शो कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >