Saturday, October 17, 2026

शिक्षकांना निवडणूक प्रचाराला जुंपणाऱ्या संस्थाचालकांची ‘एसआयटी’ चौकशी करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

मुंबई : शिक्षकांना निवडणूक प्रचारासाठी काम करण्यास भाग पाडणाऱ्या आणि उमेदवाराला मतदान न केल्यास नोकरीवरून काढण्याची धमकी देणाऱ्या शिक्षण संस्थाचालकांची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात येईल, असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. अशा प्रकारे शिक्षकांवर दबाव आणणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द करण्याचीही भूमिका त्यांनी मांडली. मुलांच्या शिक्षणाशी खेळ करून शिक्षकांना राजकीय प्रचारात उतरवणे सहन केले जाणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले, राज्यात २८८ पैकी २३२ आमदार महायुतीचे असल्याने सरकार भक्कम आहे. निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. विदर्भात महायुतीची स्थिती मजबूत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महायुतीच्या विरोधात कोणी काम करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघातून महायुतीने शिवसेनेच्या किरण सरनाईक यांना उमेदवारी दिली आहे. सरनाईक निवडून आल्यास शिक्षकांचे मूळ प्रश्न सोडवण्यासाठी ते महायुतीच्या नेत्यांकडे पाठपुरावा करतील. शिक्षकांच्या प्रश्नांवर काम करणारा नेता म्हणून ते परिचित आहेत. त्यासोबतच राज्यातील पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

निवडणुकीच्या राजकारणासाठी काही शिक्षण संस्थांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी कानावर आल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले, मतदान करणे हा प्रत्येकाचा अधिकार आणि जबाबदारी आहे. मात्र, एखाद्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी शिक्षकांवर दबाव आणणे किंवा मतदान न केल्यास नोकरीवरून काढण्याची धमकी देणे गंभीर बाब आहे. अशा तक्रारी आल्यास संबंधित संस्थेची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल आणि गरज पडल्यास मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >