Saturday, October 17, 2026

Eknath Shinde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

दसरा मेळाव्याच्या दिवशी दिवाळीचा शिधा पाठवण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

डोंबिवली: दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना मदत करण्यासाठी शिवसेना ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे. शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीनचे वाटप, शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत आणि दसरा मेळाव्याच्या दिवशी दिवाळीचा शिधा पाठवण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. डोंबिवलीतील डीएनसी शाळेच्या मैदानावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ यांच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्रोत्सवाला शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी देवीचे दर्शन घेतले आणि उपस्थितांशी संवाद साधला. दुष्काळाचे संकट दूर होऊन शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना त्यांनी देवीचरणी केली.

दांडियाऐवजी भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित या नवरात्रोत्सवात यंदा दांडियाऐवजी भजनसंध्या आणि संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवातून मिळणारा निधी दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात येत आहे. कोकणातील विविध भजन मंडळांनी सादर केलेल्या देवीच्या भजनांनी, गणेशभजनांनी आणि पारंपरिक भक्तिगीतांनी परिसर भक्तिमय झाला. महाराष्ट्राला संत आणि कष्टकऱ्यांची परंपरा लाभली आहे. भक्तिगीते, भजने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. अशा उत्सवांमुळे समाज एकत्र येतो आणि आपल्या संस्कृतीची ओळख अधिक दृढ होते, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या उपक्रमाबद्दल त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात

दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठीही मदत करण्यात येणार आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी दुष्काळग्रस्त कुटुंबांसाठी दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे अनेक ट्रक रवाना करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतनिधीचे धनादेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले. संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना आधार देणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी असल्याची भावना या उपक्रमातून व्यक्त करण्यात आली.

बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी देवीचरणी गाऱ्हाणे

नवरात्रोत्सवात मालवणी भाषेत देवीचरणी गाऱ्हाणे घालून दुष्काळाचे संकट दूर व्हावे आणि शेतकरी कुटुंबांच्या जीवनात पुन्हा आनंद नांदावा, अशी प्रार्थना करण्यात आली. कोकणातील लोकपरंपरेतून व्यक्त झालेल्या या प्रार्थनेने उपस्थित भाविकांचे लक्ष वेधले. भक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालणारा हा नवरात्रोत्सव डोंबिवलीकरांसाठी विशेष ठरला.  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >