Aruna Irani : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा ईराणी यांनी वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगानंतर पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. पती आणि प्रसिद्ध दिग्दर्शक कुकू कोहली यांच्या निधनानंतर काही काळ कामापासून दूर राहिलेल्या अरुणा ईराणी यांनी सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली. चाहत्यांकडून मिळालेलं प्रेम आणि पाठिंबा यामुळे पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची प्रेरणा मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.
भावूक व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या...
अरुणा ईराणी यांनी रविवारी 18 ऑक्टोबर रोजी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी चाहत्यांचे आभार मानले. कुकूजींच्या निधनानंतर चाहत्यांनी त्यांना जे प्रेम आणि पाठिंबा दिला, त्याबद्दल त्या मनापासून कृतज्ञ असल्याचं त्यांनी सांगितलं. “कुकूजींच्या निधनानंतर तुम्ही सर्वांनी मला जे प्रेम दिलं आणि माझी साथ दिली, त्याबद्दल मी खूप आभारी आहे. माझ्या आयुष्यातील या कठीण काळात तुम्ही माझ्यासोबत उभे राहाल, याची मला कल्पनाही नव्हती. तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळेच आज मी तुमच्यासमोर उभी आहे आणि पुन्हा काम सुरू करू शकले आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यापुढेही आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत चाहत्यांनी असंच प्रेम आणि साथ द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पती कुकू कोहली यांच्या निधनाने धक्का
अरुणा ईराणी यांचे पती आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली यांचं 25 ऑगस्ट 2026 रोजी वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.पतीच्या निधनामुळे अरुणा ईराणी यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. या कठीण काळात कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने त्यांना आधार दिला. आता चाहत्यांच्या प्रेमामुळे त्या पुन्हा कामाकडे वळल्या आहेत.
मुंबई : बॉलिवूडमध्ये कलाकारांना मिळणाऱ्या चित्रपटांच्या संधी आणि त्यामागील ओळखी यावर नेहमीच चर्चा होत असते. काही कलाकारांना त्यांच्या इंडस्ट्रीतील ...
फूल और कांटे’मधून दिग्दर्शनात एन्ट्री
कुकू कोहली यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिलं. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या फूल और कांटे या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. याच चित्रपटातून अभिनेता अजय देवगणने प्रमुख भूमिकेतून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. याशिवाय सुहाग, हकीकत, अनाड़ी नंबर १ आणि ये दिल आशिकाना यांसारख्या चित्रपटांचंही त्यांनी दिग्दर्शन केलं. त्यांच्या कामामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली.
अरुणा ईराणी यांची चित्रपट कारकीर्दही राहिली उल्लेखनीय
अरुणा ईराणी यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे हिंदी, मराठी आणि गुजराती चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. कारवाँ, बॉबी, बेटा, राजा बाबू आणि दिल तो पागल है यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. चित्रपटांसोबतच त्यांनी दूरचित्रवाणी मालिकांमध्येही काम केलं. वैयक्तिक आयुष्यातील मोठ्या दुःखानंतर पुन्हा कामाला सुरुवात करणाऱ्या अरुणा ईराणी यांच्यासाठी चाहत्यांचं प्रेम आणि पाठिंबा महत्त्वाचा ठरत आहे. त्यांच्या या नव्या सुरुवातीमुळे चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.