Nashik : शिक्षकांच्या शाळा बदलून देण्याच्या नावाखाली कथितरीत्या पैशांची मागणी केल्याच्या प्रकरणामुळे नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली असून, नांदगावचे शिक्षण विस्तार अधिकारी योगेश थोरात यांना निलंबित करण्यात आले आहे. तर प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी घेतला आहे.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नियुक्ती मिळालेल्या शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी शाळा मिळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सुमारे 42 शिक्षकांच्या शाळा बदलण्यात आल्याची माहिती समोर आल्याने आता संपूर्ण बदली प्रक्रियेची चौकशी होण्याची शक्यता आहे.
ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाची कारवाई
शिक्षकांच्या शाळा बदलण्याच्या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली. शिक्षण विस्तार अधिकारी योगेश थोरात यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळचे संबंध असल्याचे सांगून काही शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी नियुक्ती मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. या आरोपांशी संबंधित ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर प्रशासनाने पुढील पावले उचलली.
पवित्र पोर्टलद्वारे 999 जागांसाठी शिक्षक भरती
नाशिक जिल्हा परिषदेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 999 शिक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात समुपदेशनाद्वारे 680 शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या. नियुक्तीनंतर काही शिक्षकांना मिळालेल्या शाळा गैरसोयीच्या वाटत असल्याने त्यांनी शाळा बदलून मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर काही शिक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली. मात्र, नियुक्ती मिळाल्यानंतर कोणत्याही शिक्षकाची शाळा बदलली जाणार नाही, अशी भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी यापूर्वी घेतली होती.
नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा शुभारंभ ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी होणार आहे. या ऐतिहासिक पर्वाच्या ...
शाळा बदलण्याच्या 42 प्रकरणांची चौकशी होणार ?
या प्रकरणात सुमारे 42 शिक्षकांच्या शाळा बदलण्यात आल्याची माहिती समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. नियमानुसार नियुक्ती झाल्यानंतर या शिक्षकांच्या शाळा कोणत्या आधारावर बदलण्यात आल्या, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे. शिक्षकांच्या बदल्यांमध्ये नियमांचे पालन झाले होते का, संबंधित प्रस्तावांना कोणाची मंजुरी होती आणि शाळा बदलण्यामागे नेमकी कोणती प्रक्रिया राबविण्यात आली, हे चौकशीत स्पष्ट होणे अपेक्षित आहे. त्यामुळे चौकशी केवळ एका अधिकाऱ्यापुरती मर्यादित न ठेवता सर्व संबंधित प्रकरणांची तपासणी करण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त कार्यभार जगताप यांच्याकडे
प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्यानंतर त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, सरोज जगताप यांच्याकडे यापूर्वी माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचाही अतिरिक्त कार्यभार होता. आता माध्यमिक शिक्षण विभागाची जबाबदारी उपशिक्षणाधिकारी आर. आर. बोडके यांच्याकडे देण्यात आली आहे. प्रशांत दिग्रसकर रुजू होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत आर. आर. बोडके माध्यमिक शिक्षण विभागाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
शिक्षक भरती आणि बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
नाशिक जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या शाळा बदलण्याच्या प्रकरणामुळे भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या शाळा बदलताना नियमांचे पालन झाले होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ऑडिओ क्लिपमधील कथित संभाषण, 42 शिक्षकांच्या शाळा बदलल्याची माहिती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील आरोप यांची सखोल चौकशी झाल्यानंतरच या प्रकरणातील संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, शिक्षण विस्तार अधिकारी योगेश थोरात यांचे निलंबन आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या निर्णयामुळे नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीत आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.