Monday, October 19, 2026

थरारक घटना! तेल अवीवहून व्हिएन्ना जाणाऱ्या विमानाला बॉम्बची धमकी; बल्गेरियामध्ये इमर्जन्सी लँडिंगमुळे खळबळ

तेल अवीवहून व्हिएन्नाला जाणाऱ्या ऑस्ट्रियन एअरलाइन्सच्या OS82 विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याने ते बल्गेरियातील सोफिया विमानतळाकडे वळवण्यात आल्याचे वृत्त आहे. विमानाच्या सुरक्षिततेसाठी तातडीची उपाययोजना करण्यात आली. विमानात 51 प्रवासी आणि 6 क्रू सदस्यांसह 57 जण होते आणि सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.

सोफिया: आकाशात उड्डाण करणाऱ्या विमानांबाबत सुरक्षा यंत्रणा नेहमीच सतर्क असतात. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. नुकतीच एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे, जिथे ऑस्ट्रियन एअरलाइन्सच्या एका विमानाला उड्डाणादरम्यान बॉम्बची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली. यानंतर तातडीने कडक पावले उचलत विमानाचे बल्गेरियातील सोफिया विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सुदैवाने सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून, सध्या या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे.

नेमकी घटना काय घडली?

बल्गेरियाच्या परिवहन आणि दळणवळण मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ऑस्ट्रियन एअरलाइन्सचे फ्लाइट ओएस 82 (Flight OS82) हे एअरबस ए 320 (Airbus A320) विमान तेल अवीव येथून व्हिएन्नाच्या दिशेने जात होते. हे विमान रोमानियन सीमेवरून जात असताना, अचानक विमानात बॉम्ब असल्याची धमकी क्रू मेंबर्सना मिळाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पायलटने तात्काळ विमान सोफिया विमानतळाकडे वळवण्याचा निर्णय घेतला.

लढाऊ विमानाने केले संरक्षण

धमकी मिळताच स्थानिक प्रशासनाने आणि सुरक्षा यंत्रणांनी तातडीने पावले उचलली. विमान सुरक्षितपणे खाली उतरवण्यासाठी बल्गेरियन हवाई दलाच्या एका लढाऊ विमानाने (फायटर जेट) या विमानाला सोफिया विमानतळावर उतरेपर्यंत एस्कॉर्ट केले आणि सुरक्षा कवच पुरवले. विमान रात्री अंदाजे 9.25 वाजता (UTC) सोफिया विमानतळावर सुखरूप उतरले.

प्रवासी सुरक्षित, चौकशी सुरू

विमानात एकूण 51 प्रवासी आणि 6 असे मिळून 57 जण सवार होते. लँडिंगनंतर तातडीने सर्व प्रवाशांना आणि क्रू सदस्यांना कोणतीही जीवितहानी होऊ न देता सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. घटनेची गंभीर दखल घेत एक विशेष संकट व्यवस्थापन मुख्यालय स्थापन करण्यात आले असून, संबंधित यंत्रणांनी विमानाची कसून तपासणी आणि चौकशी सुरू केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा