मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्प कामांचा आयुक्तांनी घेतला आढावा, आयुक्तांनी पुन्हा प्रकल्प कामांची कमान घेतली हाती

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी कमी करून प्रवास अधिक सुगम आणि अखंड करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाच्या विविध कामांचा महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी सोमवारी १९ ऑक्‍टोबर २०२६ रोजी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. प्रकल्पाच्या विविध टप्प्यांतील कामांचे सूक्ष्म नियोजन करावे, कामाची गती वाढवावी, सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय राखून कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.


अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (पायाभूत प्रकल्प) गिरीश निकम, प्रमुख अभियंता (मुंबई किनारा रस्ता-उत्तर) मंतय्या स्वामी, उपप्रमुख अभियंता वैभव गांधी यांच्यासह संबंधित अभियंते आणि सल्लागार उपस्थित होते.


मुंबई किनारा रस्ता (उत्तर) हा सुमारे ६० किलोमीटर लांबीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आंतरबदल आणि जोडरस्त्यांसह वेसावे ते भाईंदर ही दोन नगरे किनारा रस्त्याने जोडणारा आहे.



गोरेगाव कनेक्टर आणि उन्नत मार्गाच्या कामांचा आढावा


महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या पाहणी दौऱ्याची सुरुवात दिंडोशी न्यायालय येथील गोरेगाव कनेक्टरच्या उन्नत मार्गाच्या कामापासून झाली. गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यान उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. या उड्डाणपुलाला मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाच्या कनेक्टरद्वारे जोडण्यात येणार आहे.त्यानंतर पॅकेज बी अंतर्गत गोरेगाव ते ओबेरॉय मॉलदरम्यान उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या उड्डाणपुलाच्या एकूण ३८ खांबांपैकी ११ खांबांचे बांधकाम पूर्ण झाले असून, जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. महानगरपालिका आयुक्त भिडे यांनी या कामांची सद्यस्थिती आणि पुढील नियोजनाची सविस्तर माहिती घेतली.




वीर सावरकर उड्डाणपुलावरून नवीन उन्नत मार्ग


मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पांतर्गत गोरेगाव येथील विद्यमान वीर सावरकर उड्डाणपूल (एमटीएनएल) न पाडता त्याच्या वरून नवीन उन्नत पूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उन्नत पुलामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक किनारा रस्त्याशी जोडणे शक्य होणार आहे. महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी या प्रकल्पस्थळाची पाहणी करून कामाच्या नियोजनाबाबत माहिती घेतली. यानंतर ओशिवरा - लोखंडवाला संकुल येथील मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाच्या कार्यालयात संगणकीय सादरीकरणाद्वारे प्रकल्पाच्या विविध टप्प्यांतील कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.



लोखंडवाला - मिल्लत नगर जंक्शन येथे पायलिंगची कामे सुरू


पॅकेज ए अंतर्गत लोखंडवाला - मिल्लत नगर जंक्शन येथे सुमारे १० हेक्टर जागेचे संपादन पूर्ण झाले असून, या ठिकाणी पायलिंगची कामे सुरू आहेत. महानगरपालिका आयुक्तांनी या कामांची पाहणी करून प्रगतीची माहिती घेतली. याच परिसरातील भगतसिंग नगर येथे ओशिवरा खाडीवर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली.


ओशिवरा खाडीच्या दुसऱ्या बाजूला असलेली काही बांधकामे हटविणे आवश्यक असल्याने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे (एसआरए) सातत्याने पाठपुरावा करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत भगतसिंग नगर येथील झोपडपट्टी पुनर्विकासाचे कामही मार्गी लागणे आवश्यक आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरून उतरल्यानंतर विकास योजना (डिपी) रस्त्याद्वारे नवीन जोड रोडपर्यंत थेट जोडणी उपलब्ध होऊ शकेल. यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.



माईंडस्पेस परिसरातील कामांचे नियोजन आणि अडथळ्यांचा आढावा


पॅकेज बी अंतर्गत मालाड येथील माईंडस्पेस उद्यान परिसरात आयुक्तांनी पायलिंगच्या कामांची पाहणी केली. तसेच, मालाड-दिंडोशी प्रकल्प क्षेत्रातील एमडीपी मार्ग आणि माईंडस्पेस उद्यान परिसरातील प्रस्तावित कार्यक्षेत्रे , उद्यानाची संरक्षक भिंत आणि उच्चदाब विद्युत वाहिनी यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती घेतली. कामाच्या अंमलबजावणीत येणारे अडथळे दूर करून नियोजनबद्ध पद्धतीने कामे पुढे न्यावीत, असे निर्देश त्यांनी दिले.




चारकोप येथे दुहेरी भूमिगत बोगद्यांसाठी लॉन्चिंग शाफ्टचे काम सुरू


मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाच्या पॅकेज सी आणि डी अंतर्गत मालाड येथील माईंडस्पेस ते कांदिवलीतील चारकोपदरम्यान प्रत्येकी सुमारे ३.९ किलोमीटर लांबीचे उत्तर व दक्षिण दिशेचे दुहेरी भूमिगत बोगदे उभारण्यात येणार आहेत. पॅकेज सी अंतर्गत उत्तरवाहिनी, तर पॅकेज डी अंतर्गत दक्षिणवाहिनी बोगद्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. या दुहेरी भूमिगत बोगद्यांच्या बांधकामासाठी कांदिवलीतील चारकोप येथे लॉन्चिंग शाफ्ट उभारण्याचे काम सुरू आहे. यासाठी सुमारे ६५ मीटर लांबी आणि ४० मीटर रुंदीच्या क्षेत्रात खोदकाम व पायलिंगची कामे हाती घेण्यात आली आहेत. आयुक्त आश्विनी भिडे यांनी या कामांची पाहणी करून कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.



चारकोप ते गोराई इंटरचेंज दरम्यानच्या कामाची पाहणी


पॅकेज ई अंतर्गत कांदिवलीतील चारकोप इंटरचेंज ते गोराई इंटरचेंजदरम्यान सुमारे ३.७८ किलोमीटर लांबीचा मार्ग विकसित करण्यात येत आहे. आयुक्तांनी या प्रकल्पस्थळालाही भेट देऊन कामाची पाहणी केली

Comments
Add Comment

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाच्या बोगदा खणन कामाला गती! ‘तुळशी’द्वारे १८३ मीटर खोदकाम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड

मुंबई महानगरपालिकेत ई-ऑफिस प्रणालीची पुन्हा अंमलबजावणी! तब्बल १४ हजार वापरकर्त्यांचा टप्प्याटप्प्याने करणार समावेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) संपूर्ण मुंबई महानगरपालिकेत ई-ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : पोलिसांच्या हाती मोठे पुरावे, लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध उघड होण्याची शक्यता!

मुंबई : मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफच्या घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणाचा कसून तपास करत असताना,

Tiger Shroff firing case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : सर्व ३ आरोपी १८ ते २२ वयोगटातील, मुंबई गुन्हे शाखेची माहिती

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त (DCP) राज तिलक रोशन यांनी १९ ऑक्टोबर रोजी स्पष्ट केले की, अभिनेता टायगर

मुंबईत बेकायदा बॅनर- फ्लेक्सवर BMCची कारवाई; 52 हजारांहून अधिक पोस्टर्स हटवले, FIR दाखल

मुंबई: बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून मुंबई शहरामध्ये बेकायदेशीर बॅनर, फ्लेक्स आणि पोस्टर विरोधात धडक कारवाई

Weather Update : मुंबईत उष्णतेची लाट कायम; तापमान 35°C पोहोचण्याची शक्यता, हवा गुणवत्ताही खालावली

मुंबई : मुंबईकरांना सध्या तीव्र उष्णता आणि दमट वातावरणाचा सामना करावा लागत असून, भारतीय हवामान विभागाच्या (IMD)