मुंबई महानगरपालिकेत ई-ऑफिस प्रणालीची पुन्हा अंमलबजावणी! तब्बल १४ हजार वापरकर्त्यांचा टप्प्याटप्प्याने करणार समावेश

प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कार्यक्षम होणार; महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


संपूर्ण मुंबई महानगरपालिकेत ई-ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत सुमारे १४ हजार वापरकर्त्यांचा समावेश केला जाणार असून, प्रणालीच्या प्रभावी वापरासाठी प्रत्येक स्तरावरील भूमिका आणि जबाबदाऱ्या निश्चित करण्यात येणार आहेत. ई-ऑफिस प्रणालीच्या पुनःअंमलबजावणीसह तिचा प्रशासकीय कामकाजात प्रभावीपणे स्वीकार करण्याबाबत परिपत्रकही निर्गमित करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिली.



मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांची मासिक आढावा बैठक १७ ऑक्टोबर २०२६ वरळी येथील कमांड अँड कंट्रोल सेंटर येथे पार पडली. या बैठकीत ई-ऑफिस प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक पूर्वतयारी, तांत्रिक सुविधा, प्रशिक्षण आणि प्रशासकीय स्तरावरील नियोजनाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) डॉ. एम. देवेंदर सिंह आणि उप आयुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड उपस्थित होते. तसेच, सर्व सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त आणि खातेप्रमुख यांचीही उपस्थिती होती.



ई-ऑफिसमुळे प्रशासकीय कामकाजाचे डिजिटायझेशन


महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेत या प्रणालीच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे कार्यालयीन कामकाज डिजिटल माध्यमातून पार पाडणे शक्य होणार असून, कागदी फाईल्सचा वापर कमी होईल. टिप्पण्या, मसुदे, प्रस्ताव आणि मंजुरी यांची प्रक्रिया निश्चित कार्यपद्धतीनुसार ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करता येणार आहे. परिणामी, कामकाजाचा वेग वाढण्यासोबतच प्रशासकीय प्रक्रियांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व अधिक प्रभावीपणे सुनिश्चित करता येईल,असे भिडे यांनी स्पष्ट केले.



माहिती व्यवस्थापन अधिक सुलभ राखण्याचा प्रयत्न


ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक फाईल्स तयार करणे, त्यांचे व्यवस्थापन करणे आणि संबंधित अधिकारी किंवा कार्यालयाकडे पाठविणे सुलभ होणार आहे. आवक-जावक पत्रव्यवहाराची नोंद ठेवणे, प्राप्त पत्रे स्कॅन करून प्रणालीमध्ये समाविष्ट करणे तसेच त्यावरील कार्यवाहीचा मागोवा घेणे शक्य होईल. टिप्पण्या, मसुदे आणि आदेशांवर डिजिटल स्वाक्षरीच्या माध्यमातून मंजुरी देण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे. याशिवाय, फाईल्सची हालचाल, प्रलंबित प्रकरणे, घेतलेले निर्णय आणि पत्रव्यवहार यांचा मागोवा घेता येईल. इलेक्ट्रॉनिक अभिलेखांची नोंद, जतन आणि संग्रहण करण्यासह दस्तऐवजांचा केंद्रीकृत संग्रह उपलब्ध झाल्यामुळे माहितीचे व्यवस्थापन अधिक सुलभ आणि परिणामकारक होणार आहे.



प्रशिक्षण, तांत्रिक सुविधा आणि डिजिटल स्वाक्षरीवर भर


ई-ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत नोडल अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. विभागप्रमुखांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यसंघ स्थापन करून अंमलबजावणीच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. प्रणालीच्या वापरासाठी आवश्यक संगणकीय सुविधा आणि तांत्रिक पायाभूत व्यवस्था उपलब्ध करून देण्यासोबतच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे. स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असेही महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्प कामांचा आयुक्तांनी घेतला आढावा, आयुक्तांनी पुन्हा प्रकल्प कामांची कमान घेतली हाती

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी कमी करून प्रवास अधिक सुगम आणि अखंड करण्याच्या उद्देशाने

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाच्या बोगदा खणन कामाला गती! ‘तुळशी’द्वारे १८३ मीटर खोदकाम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : पोलिसांच्या हाती मोठे पुरावे, लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध उघड होण्याची शक्यता!

मुंबई : मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफच्या घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणाचा कसून तपास करत असताना,

Tiger Shroff firing case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : सर्व ३ आरोपी १८ ते २२ वयोगटातील, मुंबई गुन्हे शाखेची माहिती

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त (DCP) राज तिलक रोशन यांनी १९ ऑक्टोबर रोजी स्पष्ट केले की, अभिनेता टायगर

मुंबईत बेकायदा बॅनर- फ्लेक्सवर BMCची कारवाई; 52 हजारांहून अधिक पोस्टर्स हटवले, FIR दाखल

मुंबई: बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून मुंबई शहरामध्ये बेकायदेशीर बॅनर, फ्लेक्स आणि पोस्टर विरोधात धडक कारवाई

Weather Update : मुंबईत उष्णतेची लाट कायम; तापमान 35°C पोहोचण्याची शक्यता, हवा गुणवत्ताही खालावली

मुंबई : मुंबईकरांना सध्या तीव्र उष्णता आणि दमट वातावरणाचा सामना करावा लागत असून, भारतीय हवामान विभागाच्या (IMD)