Tuesday, October 20, 2026

हिवाळी अधिवेशनाआधी राष्ट्रवादीला अर्थखाते द्या !

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुत्र पार्थसह घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

मुंबई : हिवाळी अधिवेशन जवळ येत असताना राज्याच्या अर्थखात्याच्या वाटपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी सोमवारी रात्री उशिरा खासदार पुत्र पार्थ पवार यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावे, अशी पक्षाची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या भेटीमुळे हिवाळी अधिवेशनापूर्वी खातेवाटपाचा तिढा सुटणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अनुपस्थितीत झालेली ही दुसरी भेट असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली दौऱ्यातील या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि अर्थखात्याच्या वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, या चर्चेचा अधिकृत तपशील समोर आलेला नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. हे खाते सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवावे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनीही यासाठी आग्रह धरला आहे. आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अर्थखात्याचा निर्णय झाल्यास राज्याच्या आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने त्याला महत्त्व प्राप्त होणार आहे.

यापूर्वी पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची समन्वय बैठक झाली होती. या बैठकीतही अर्थखात्याच्या वाटपाचा मुद्दा चर्चेत आल्याचे सांगितले जाते. मात्र, महायुतीत कोणतीही नाराजी किंवा वाद नसल्याचे भाजप आमदार राहुल कुल यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे खातेवाटपाबाबत महायुतीतील चर्चेचा नेमका निष्कर्ष काय निघतो, याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, १८ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अर्थखात्याच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली होती. सुनेत्रा पवार यांना अर्थमंत्रिपद मिळणार नसल्याचे सांगत, अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपने अर्थखाते स्वतःकडेच ठेवल्याची टीका त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या अमित शाह यांच्याशी झालेल्या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी मान्य होणार की अर्थखाते मुख्यमंत्र्यांकडेच राहणार, हे येत्या डिसेंबर महिन्यात स्पष्ट होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >