मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) परिसरात एका 60 वर्षीय पालिका कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बनावट मृत्यू प्रमाणपत्राचा वापर करून ही घटना दडपण्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे. या प्रकरणी मंगळवारी (20 ऑक्टोबर 2026) एका डॉक्टरसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 नुसार शिकार करणे बेकायदेशीर असले तरी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी वस्त्यांचे रहिवासी असलेले सात जण रानडुकरांच्या शिकारीसाठी निघाले असताना ही घटना घडली. गटातील काही सदस्यांनी त्याच गटातील विजय सुखारू सपटे या पालिका कर्मचाऱ्याला वन्य प्राणी समजून त्याच्या दिशेने गोळीबार केला, ज्यात त्या पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आणि गटातील इतर दोन सदस्य जखमी झाले.
मीरा- भायंदर- वसई- विरारचे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गट सोमवारी रात्री उशिरा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील चेना गावाजवळील जंगलात बंदुका, पेलेट्स आणि रानडुकरांच्या शिकारीसाठी वापरले जाणारे इतर साहित्य घेऊन घुसला होता. उपायुक्त चव्हाण यांच्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री अंधारात झुडुपांमध्ये काहीतरी हालचाल झाल्याचे शिकाऱ्यांपैकी एकाला दिसले. तिथे एखादा प्राणी लपला असावा असे वाटून त्याने गोळीबार केला, ज्यात चुकून त्यांच्याच गटातील सदस्य विजय सपटे यांच्या छातीत गोळी लागली.
Mumbai Fire News: अंधेरी येथील साकीनाका परिसरातील खैराणी रोड येथे मंगळवारी (20 ऑक्टोबर) सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य चार ...
सपटे हे महापालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून कामाला होते. त्यांना गटातील सदस्यांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी मीरा रोड येथील एका खासगी डॉक्टरशी संपर्क साधला, ज्यांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करणारे मृत्यू प्रमाणपत्र दिले. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. गटातील इतर दोन सदस्य, कुणाल शेलार आणि कल्पेश धंगला, यांच्या मांडीला आणि खांद्याला अनुक्रमे गोळी लागल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर काशिमीरा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वन अधिकाऱ्यांनी पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी शिकारी गटातील सदस्यांची चौकशी केली असता, त्यांनी दावा केला की नदीत मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या एका स्फोटक उपकरणाचा स्फोट झाल्याने ते जखमी झाले होते. पण पुढील तपासात असे उघड झाले की, गटातीलच सदस्यांनी चुकून त्यांच्यावर गोळीबार केल्याने त्यांच्यापैकी तिघे जण गोळी लागून जखमी झाले होते आणि त्या तीन जखमींपैकी एकाच मृत्यू झाला होता. त्या गटाने एका खाजगी डॉक्टरांच्या मदतीने अधिकाऱ्यांना माहिती न देता किंवा शवविच्छेदन न करता मंगळवारी पहाटे सपटे यांच्यावर अंत्यसंस्कार करून ही घटना दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा संशय पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यानंतर गटातील तीन सदस्यांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील त्यांच्या वस्तीतून पकडण्यात आले, तर डॉक्टरला मीरा रोड येथील त्याच्या घरातून अटक करण्यात आली. चारही आरोपींवर खून आणि इतर गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.