बुधवारी (21 ऑक्टोबर) संध्याकाळी सौदी अरेबियातील दम्माम येथील विमानतळावर झालेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. यासंदर्भातील माहिती सौदी अरेबियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने (GACA) दिली आहे. किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर ठार झालेल्यांमध्ये एक सौदी नागरिक आणि एक भारतीय रहिवासी होते. तर जखमींमध्ये सौदी, भारतीय, येमेनी, बांगलादेशी आणि नेपाळी नागरिकांचा होता. GACA ने कोणत्या प्रकारचा हल्ला झाला हे सांगितले नसेल तरी येमेनच्या इराण समर्थित हौथी चळवळीने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी सौदी अरेबियाच्या विमानतळांना वारंवार लक्ष्य केले आहे.
जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. हौथींनी रियाधच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासह सौदी विमानतळांना तसेच सरकारी तेल कंपनी सौदी अरामकोला वारंवार लक्ष्य केले आहे. रियाधमधील अमेरिकी दूतावासाने बुधवारी हौथींकडून सौदी अरेबियावर होणाऱ्या संभाव्य पुढील हल्ल्यांबाबत सुरक्षा सूचना जारी केली. हल्ल्यानंतर दम्माम येथील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कामकाज तात्पुरते विस्कळीत झाले होते. हल्ल्यानंतर लगेचच किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारी विमाने तात्पुरती वळवण्यात आली आणि येणाऱ्या जाणाऱ्या हवाई वाहतुकीला विलंब झाला. सौदी अरेबियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने पुष्टी केली की, या हल्ल्यामुळे विमानतळाच्या परिसरात मालमत्तेचे नुकसान झाले असून सुरक्षा आणि देखभाल पथकांनी पूर्ण कामकाज सुरु होण्यापूर्वी त्याची पाहणी केली. सुरक्षा आणि संरक्षणात्मक नियमावली पूर्ण झाल्यानंतर विमानतळाचे कामकाज पुन्हा सुरु झाले असून हवाई वाहतूक पूर्ववत झाली आहे, असे GACA ने जाहीर केले.
चंदीगड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमधील रायपूर येथील ५६ वर्षीय व्यावसायिक दीपक मित्तल हे बुधवारी (२१ ऑक्टोबर) सकाळी सेक्टर १७ मधील ...
हौथी आणि सौदी अरेबियातील संघर्ष काही नवीन नाही. याआधीदेखील हौथींकडून सौदी अरेबियावर वारंवार हल्ले घडवण्यात आले आहेत. 11 ऑक्टोबर रोजी रियाधच्या किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि 11 जण जखमी झाले होते. 10 ऑक्टोबर रोजी, नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने कळवले की त्याच विमानतळावर झालेल्या एका वेगळ्या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला आणि 300 हून अधिक जण जखमी झाले होते. ऑक्टोबर महिना सुरु झाल्यापासून जवळपास 21 लोकांचा हौथी हल्ल्यात मृत्यू झाल्याचे सौदी प्राधिकरणाने सांगितले आहे.
हौथी- सौदी अरेबिया संघर्ष पार्श्वभूमी
या युद्धाची सुरुवात 2014 मध्ये झाली, जेव्हा हौथींनी राजधानी सना येथून आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सरकारला पदच्युत केले. पुढच्याच वर्षी सौदीच्या नेतृत्वाखालील अरब राष्ट्रांच्या आघाडीने सरकारचे शासन पुन्हा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात हस्तक्षेप केल्यानंतर हा संघर्ष अधिक तीव्र झाला. जुलै महिन्यात जेव्हा हौथींनी सौदी अरेबियाविरुद्ध 'सागरी निर्बंध' जाहीर केले आणि लाल समुद्रातील सौदी विमानतळे, तेल सुविधा आणि टँकर्सवर क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले सुरु केले, तेव्हा चार वर्ष जुना शस्त्रसंधी संपुष्टात येऊ लागला.
सौदी अरेबियाने त्यांच्या प्रदेशावर लादलेल्या नाकेबंदीचा तसेच सना विमानतळावर झालेल्या हवाई हल्ल्याचा बदला म्हणून आपण ही कारवाई करत असल्याचे हौथींनी म्हटले आहे. जागतिक सागरी वाहतुकीसाठी महत्त्वाचा अडथळा असलेल्या बाब अल मंदाब समुद्रधुनीजवळ येमेनच्या नैऋत्येकडील तांबड्या समुद्राच्या किनाऱ्याचा काही भाग हौथींनी ताब्यात घेल्यानंतर सप्टेंबरमध्ये संघर्ष अधिक तीव्र झाला. या महिन्याच्या सुरुवातीला सरकार समर्थक सैन्याने सौदी हवाई मदतीने प्रतिहल्ला केल्यानंतर बाब अल मंदाबच्या आसपासच्या प्रदेशावर पुन्हा नियंत्रण मिळवल्याचे सांगितले.