0,0,0,0,0,0..! संजू सॅमसनने पहिल्याच षटकात नकोसा विक्रम रचला, झालं असं की..
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात संजू सॅमसनची बॅट हवी तशी चालली नाही. संजू सॅमसन या सामन्यात फक्त 14 धावा करून बाद झाला. पण एक नकोसा विक्रम नावावर करून गेला.
October 24, 2026 03:49 PM
0,0,0,0,0,0..! संजू सॅमसनने पहिल्याच षटकात नकोसा विक्रम रचला, झालं असं की.. (Photo: ANI)
न्यूझीलंडने दुसऱ्या टी20 सामन्यात विजयासाठी 180 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात काही खास झाली नाही. पॉवरप्लेमध्ये भारताला फक्त 44 धावा करता आल्या. खरं तर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही आक्रमक फलंदाजी करणारी जोडी असूनही पदरी निराशा पडली. या सामन्याची सुरूवात मूळात नकोशी झाली. संजू सॅमसनला पहिल्या षटकात एकही धाव काढता आली नाही. टी20 क्रिकेटमध्ये डावातील पहिले षटक निर्धाव खेळणे हा कोणत्याही फलंदाजासाठी एक नकोसा विक्रम मानला जातो. टी20 क्रिकेटमध्ये पॉवरप्लेच्या पहिल्या चेंडूपासूनच वेगाने धावा काढण्याची रणनीती असते, त्यामुळे संपूर्ण पहिले षटक एकही धाव न घेता खेळून काढणे ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. त्यामुळे या नकोशा यादीत आता संजू सॅमसनचा समावेश झाला आहे.
संजू सॅमसन नकोशा पंगतीत
भारताकडून हा नकोसा विक्रम सर्वाधिक वेळा माजी सलामीवीर केएल राहुलच्या नावावर नोंदवला गेला आहे. केएल राहुलने तब्बल पाच वेळा डावातील पहिले षटक निर्धाव खेळले आहे. याशिवाय शिखर धवन (2 वेळा), सूर्यकुमार यादव (2 वेळा), रोहित शर्मा (1 वेळ), यशस्वी जयस्वाल (1 वेळ), इशान किशन (1 वेळ), आणि शुभमन गिल (1 वेळ) यांनी पहिलं षटक निर्धाव घातलं आहे. आता या यादीत संजू सॅमसनचा समावेश झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात ख्राइस्टचर्च येथे संजू सॅमसनने पहिलं षटक निर्धाव घालवलं. न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीने टाकलेले सामन्यातील पहिलेच षटक त्याने पूर्णपणे निर्धाव खेळून काढले. त्यामुळे न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं आव्हान खडतर हे पहिल्याच षटकात दिसून आलं.
क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात भारत न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी20 सामना सुरू आहे. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि न्यूझीलंडला ...
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात संजू सॅमसन सामनावीराचा मानकरी ठरला होता.त्याने 33 चेंडूत 67 धावांची खेळी केली होती. पण दुसऱ्या टी20 सामन्यात त्याची बॅट काही चालली नाही. संजू सॅमसनने दुसऱ्या सामन्यात 17 चेंडूंचा सामना केला आणि 1 चौकार आणि एक षटकार मारत 14 धावांवर बाद झाला.