Saturday, October 24, 2026

Chhagan Bhujbal News: मंत्री छगन भुजबळ नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीचा घेतला आढावा, अधिकाऱ्यांना दिले महत्त्वाचे आदेश

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही नाशिक जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेतला. दुष्काळाच्या परिस्थितीत नागरिकांना पिण्याचे पाणी, अन्नधान्य वितरण आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन करण्याचे आदेश मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.

नाशिक: संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ परिस्थिती आहे. दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अनेक मंत्री आपल्या जिल्ह्यामध्ये जाताना दिसत आहेत. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही नाशिक जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेतला. दुष्काळाच्या परिस्थितीत नागरिकांना पिण्याचे पाणी, अन्नधान्य वितरण आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन करण्याचे आदेश मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.

येवला मतदारसंघात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, वीजपुरवठा आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विकासकामे पूर्ण करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले. येवला मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीचा आणि विविध विकासकामांचा मंत्री भुजबळ यांनी आढावा घेतला. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, येवला उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, पोलीस उपअधीक्षक रोशन पंडितसह वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध पाणी काटकसरीने वापरा. पाणी उपलब्ध असलेल्या विहिरी, बोअरवेल आणि अन्य पाणीस्रोतांचे सर्वेक्षण करून गरजेनुसार अधिग्रहणाची कार्यवाही करावी. ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याची सद्यस्थिती तपासून संभाव्य टँकर मागणीचा आढावा घ्यावा आणि आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे. दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना आवश्यक उपाययोजनांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही गतिमान ठेवावी, असेही मंत्री भुजबळ यांनी सांगितले. पशुधनासाठी चारा उपलब्धतेच्या दृष्टीने चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन द्यावे, वनविभागाच्या क्षेत्रात पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी नियमानुसार चारा लागवडीची शक्यता तपासावी. तसेच आवश्यक नियम व परवानग्यांच्या अधीन राहून मेंढपाळ आणि चराऊ जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

येवला 38 गावे, राजापूर 40 गावे, धुळगाव 16 गावे तसेच विंचूर-लासलगावसह 16 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या रेट्रोफिटिंगच्या कामांसह प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. येवला व निफाड तालुक्यातील शेती व ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याचा आढावा घेत नादुरुस्त रोहित्रांची तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देशही मंत्री भुजबळ यांनी दिले. यामुळे शेतकरी आणि नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित विभागांनी तत्परतेने कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >