
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून एक अत्यंत खळबजनक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu tawde)यांच्या कार्यालयाला आणि शहरातील एका नामांकित अमेरिकन स्कूलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आल्यामुळे संपूर्ण शहरात एकच तारांबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने तात्काळ तपास सुरू केला असून, यासंदर्भात नॉन-कोग्निझेबल (NC) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींनाही लक्ष्य करण्याची भीती
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मिळालेल्या या धमकीच्या ईमेलमध्ये केवळ महापौर कार्यालय आणि शाळेचाच उल्लेख नाही, तर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि प्रसिद्ध गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ यांसारख्या अनेक बड्या सेलिब्रिटींची नावे देखील नमूद करण्यात आली आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी (२३ ऑक्टोबर २०२६) अझरबैजानची राजधानी बाकू येथे असलेल्या ऐतिहासिक ‘अतेशगाह’ (Ateshgah) या ...
पोलिसांकडून वेगाने तपास सुरू
शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत कार्यालयाला हा धमकीचा ईमेल प्राप्त झाला होता. हा ईमेल मिळताच मुंबई पोलिसांनी कोणतीही वेळ वाया न घालवता तातडीने पावले उचलली. हा धमकीचा ईमेल नेमका कुठून आला आणि तो कुणी पाठवला, याचा छडा लावण्यासाठी मुंबई पोलिसांचे विशेष पथक आणि सायबर सेलचे अधिकारी संयुक्तपणे कसून तपास करत आहेत.
नार्वे (Norway) कनेक्शन आणि व्हीपीएनचा वापर
या संपूर्ण प्रकरणाचा तांत्रिक तपास करत असताना पोलिसांच्या हाती एक महत्त्वाची माहिती लागली आहे. प्राथमिक तपासादरम्यान असे स्पष्ट झाले आहे की, हे धमकीचे ईमेल थेट नार्वे देशातून पाठवले असण्याची दाट शक्यता आहे. भामट्यांनी आपली खरी ओळख लपवण्यासाठी आणि तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) चा वापर केला असावा, असा दावा पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे. सध्या या सायबर गुन्ह्याच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई पोलिसांकडून तांत्रिक पडताळणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरात लवकर या प्रकरणातील दोषींचा शोध घेतला जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






