मुंबईत सण-उत्सवांच्या काळात होणारे वायू व ध्वनिप्रदूषण कमी करण्यासह पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत ‘फटाकेमुक्त-प्रदूषणमुक्त पर्यावरण’ ही जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे करण्याची सवय रुजविणे, प्रदूषणाचे दुष्परिणाम समजावून सांगणे तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, हा प्रमुख उद्देश आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अनुषंगाने तसेच शासनाच्या पर्यावरणविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार महानगरपालिकेकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे. फटाक्यांमुळे होणारे वायू व ध्वनिप्रदूषण, नागरिकांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना होणारा त्रास, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे. तसेच फटाक्यांमुळे निर्माण होणारा कचरा आणि पर्यावरणाची होणारी हानी याविषयीही जागरूकता निर्माण केली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत शाळांमध्ये विविध शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
व्हिडीओ, रिल्स स्पर्धा - फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण, आरोग्यावरील दुष्परिणाम व फटाकेमुक्त सणांचे महत्त्व या विषयांवर विद्यार्थी लघु व्हिडीओ व रिल्स तयार करणार आहेत.
पोस्टर व बॅनर स्पर्धा - ‘फटाके नकोत, स्वच्छ हवा हवी’, ‘प्रदूषणमुक्त सण, आरोग्यदायी जीवन’ अशा संदेशांवर आधारित पोस्टर व बॅनर तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
घोषवाक्य स्पर्धा - फटाकेमुक्त सण, पर्यावरण संरक्षण, ध्वनिप्रदूषण नियंत्रण आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या विषयांवर प्रभावी घोषवाक्ये तयार करण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
जनजागृती रॅली व प्रतिज्ञा - विद्यार्थ्यांच्या सहभागातून शाळेच्या परिसरात जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त सण साजरे करण्याबाबत पर्यावरण संरक्षणाची प्रतिज्ञा देण्यात येणार आहे.
पथनाट्य व प्रबोधनकार कार्यक्रम - फटाक्यांमुळे होणारे दुष्परिणाम आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे करण्याचे महत्त्व यावर आधारित पथनाट्य, भाषण, निबंधलेखन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
पालक व समाज सहभाग - विद्यार्थ्यांनी तयार केलेले व्हिडीओ, रिल्स, पोस्टर्स व घोषवाक्ये यांच्या माध्यमातून पालक व स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
विद्यार्थी घेणार प्रतिज्ञा
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालक व समाजामध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे. शाळा परिसरात जनजागृतीपर उपक्रम राबवून फटाकेमुक्त सण साजरे करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. यासाठी शाळेच्या परिपाठामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैली, सामाजिक जाणीव आणि सार्वजनिक आरोग्याबाबतची जबाबदारी विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे आहे. सणांचा आनंद साजरा करताना पर्यावरणाचे रक्षण करणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश या मोहिमेद्वारे देण्यात येत आहे.