नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर कर्तव्यातील कसूर आणि कथित आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणांमध्ये कठोर पाऊल उचलले आहे. महादेवनगर, टाकेहर्ष आणि देवडोंगरी या तीन ग्रामपंचायतींमधील अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून यासंदर्भात स्वतंत्र आदेश जारी करण्यात आले आहेत. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये महादेवनगरचे मुरलीधर पांडुरंग गावित, टाकेहर्षचे तुषार रुपसिंग राजपूत आणि देवडोंगरीचे सतीश नानाभाऊ बच्छाव यांचा समावेश आहे.
आर्थिक अनियमिततेसह कर्तव्यातील कसुरीचे आरोप
महादेवनगरचे ग्रामपंचायत अधिकारी मुरलीधर गावित यांच्याविरोधात आर्थिक अनियमिततेसह अनेक प्रशासकीय त्रुटींचे आरोप करण्यात आले आहेत. मुख्यालयात परवानगीशिवाय अनुपस्थित राहणे, मासिक सभेला गैरहजर राहणे, लेखापरीक्षणासाठी आवश्यक शासकीय अभिलेख उपलब्ध न करून देणे आणि कारणे दाखवा नोटिशीला वेळेत उत्तर न देणे, या बाबींचा त्यात समावेश आहे.
टाकेहर्षचे ग्रामपंचायत अधिकारी तुषार राजपूत यांच्यावर २६ जानेवारी २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजवंदन न केल्याचा आणि कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर देवडोंगरीचे ग्रामपंचायत अधिकारी सतीश बच्छाव यांच्याविरोधात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या वापरातील कथित आर्थिक अनियमितता, कारणे दाखवा नोटिशीला मुदतीत उत्तर न देणे आणि कर्तव्यात कसूर करणे, या कारणांवरून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांची विक्री आणि आतषबाजीसंदर्भात पोलिस प्रशासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणे, ...
गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर कारवाई
पंचायत समिती त्र्यंबकेश्वरचे गटविकास अधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम, १९६७ मधील नियम ३ चे उल्लंघन झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६४ मधील नियम ३(१)(अ) अंतर्गत निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
निलंबनाच्या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांचे मुख्यालय पंचायत समिती, त्र्यंबकेश्वर (मालेगाव) येथे निश्चित करण्यात आले आहे. या कालावधीत मुख्यालयी उपस्थित राहणे, निर्वाह भत्त्यासाठी नियमानुसार आवश्यक प्रमाणपत्र सादर करणे आणि संबंधित ग्रामपंचायतींचा कार्यभार नियुक्त अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करणे, या सूचना देण्यात आल्या आहेत.
पंचायत समितीच्या कामकाजाचाही घेतला आढावा
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी त्र्यंबकेश्वर दौऱ्यात पंचायत समिती कार्यालयालाही भेट देऊन विविध प्रशासकीय कामांचा आढावा घेतला. यावेळी गटविकास अधिकारी रविकांत सानप उपस्थित होते. ग्रामपंचायतींच्या कामकाजावर पंचायत समिती स्तरावरून ठेवण्यात येणारे नियंत्रण, विविध विकासकामांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय यंत्रणेची कार्यक्षमता यांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
दुष्काळ निवारणाशी संबंधित कामे आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीत कोणतीही दिरंगाई होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी. तसेच आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत आणि गांभीर्याने पार पाडाव्यात, अशा स्पष्ट सूचना ओमकार पवार यांनी दिल्या. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता राखणे, शासकीय निधीचा योग्य वापर करणे आणि नागरिकांशी संबंधित कामे वेळेत पूर्ण करणे, याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट होत आहे.