Saturday, October 24, 2026

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील सुरत कनेक्शन समोर; मुंबई क्राइम ब्रँचने 2 बंदुका, 10 काडतुसे जप्त

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाचा मुंबई क्राईम ब्रँचकडून तपास केला जात आहे. ह्या तपासादरम्यान पोलिसांनी सुरतमधून दोन शस्त्र आणि 10 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहे.

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. रविवारी 18 ऑक्टोबर रोजी रात्री जुहूमध्ये दोन हल्लेखोरांनी त्यावर हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी आता मुंबई क्राइम ब्रँचकडून कसून चौकशी करत हल्लेखोरांना अटक केली जात आहे. हाय प्रोफाईल प्रकरणाचा तपास करत, पोलिसांनी सुरतमधून दोन शस्त्र आणि 10 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहे. हल्ल्यात वापरल्या गेलेल्या शस्त्रांचा स्रोत आणि पुरवठा साखळीचा तपास सुरू असतानाच, शुक्रवारी, 23 ऑक्टोबर रोजी ही जप्ती करण्यात आली.

काही मिडिया रिपोर्टनुसार, सुरतमध्ये जप्त केलेल्या शस्त्रांचा वापर अभिनेत्याच्या कारवर गोळीबार करताना करण्यात आल्याची माहिती आहे. पण अद्याप मुंबई क्राइम ब्रांचकडून याबद्दलची कोणतीही माहिती मिळालेली नाही. मुंबई क्राइम ब्रँचने केलेल्या कारवाईमध्ये, दोन शस्त्र आणि 10 काडतुसांसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची एकूण संख्या 10 पर्यंत आहे. अवैध शस्त्रे आणि दारुगोळा उपलब्ध करून देणे, टेहळणी करणे आणि गोळीबार करण्यात एका आंतरराज्यीय नेटवर्कच्या भूमिकेची गुन्हे शाखा चौकशी करत आहे.

सुरतमधून अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची ओळख अंकित उर्फ ​​सरपंच राजेश खटक (18), समीर हसन खत्री (19) आणि जतीन कृष्ण पांचाळ (27) अशी पटली आहे. हे तिघेही हरियाणातील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या तिन्ही आरोपींना 22 ऑक्टोबर रोजी दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले आणि 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांना संशय आहे की, आरोपीने गोळीबार करणाऱ्यांसाठी शस्त्रे आणि दारुगोळा उपलब्ध करून देण्यास मदत केली. यापूर्वी अटक केलेल्या व्यक्ती आणि इतर संशयितांशी समन्वय साधला. गोळीबाराच्या घटनेशी त्यांचा संभाव्य संबंध आहे का, हे तपासण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पोलीस आता जप्त केलेल्या शस्त्रांची आणि काडतुसांची तपासणी करत आहेत.

पोलिसांना तपासाअंती असे समोर आले की, अंकित रेकी करण्यासाठी मुंबईला गेला होता. हल्ल्याच्या नियोजनात सहभागी झाला होता. तिन्ही आरोपी कथित मुख्य सूत्रधार अनिल पंडितच्या थेट संपर्कात होते का, याचाही तपास गुन्हे शाखा करत आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम 61(2) आणि 111, जे अनुक्रमे गुन्हेगारी कट आणि संघटित गुन्हेगारीशी संबंधित आहेत. यांसोबतच शस्त्र कायद्याच्या कलम 27 चा वापर केला आहे. एका संघटित गुन्हेगारी नेटवर्कचा कथित सहभाग आणि अवैध शस्त्रांच्या आंतरराज्यीय हालचालींची तपास यंत्रणा चौकशी करत असल्याने या तरतुदी जोडण्यात आल्या आहेत.

गुन्हे शाखा कोठडीतील चौकशीची मागणी करत आहे, जेणेकरून शस्त्रास्त्रांची व्यवस्था कोणी केली, शस्त्रे आणि दारूगोळा कुठून आला, हल्ल्याचा आदेश कोणी दिला आणि अटक केलेल्या व पाहिजे असलेल्या आरोपींनी यात कोणती भूमिका बजावली, हे स्पष्ट होईल. हे नेटवर्क इतर गुन्ह्यांसाठी शस्त्रे पुरवत होते का आणि या कार्यात आणखी कोणी सहभागी होते का, याचीही पोलीस तपासणी करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >