नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय सीमांचा गैरवापर करून देशाच्या युवा पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यात अडकवणाऱ्या तस्करांवर केंद्रीय यंत्रणांनी मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय तपास यंत्रणा तसेच आसाम, मिझोराम आणि मणिपूर पोलिसांच्या संयुक्त आणि यशस्वी कारवाईचे कौतुक केले असून, भारताच्या तरुणाईशी खेळणाऱ्या कोणत्याही टोळीला सोडले जाणार नाही, असा कडक इशारा दिला आहे.
‘ऑपरेशन ट्रायडंट’ अंतर्गत मोठी कारवाई
केंद्रातील मोदी सरकारच्या अमली पदार्थविरोधी ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत ‘ऑपरेशन ट्रायडंट’ राबविण्यात आले आहे. याद्वारे आंतरराष्ट्रीय नार्को-कार्टेलला मोठा धक्का देण्यात आला आहे. 23 ऑक्टोबर रोजी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि राज्य पोलिसांनी संयुक्त मोहिमेत आसाम, मिझोराम आणि मणिपूरमधील 38 वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी जोरदार छापेमारी करून तस्करांचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त केले आहे.
कारवाईतील प्रमुख मुद्दे:
हवाला व्यवहार: तपासादरम्यान सुमारे 100 कोटी रुपयांच्या संशयास्पद हवाला व्यवहारांची माहिती उघड.
खाती आणि संपत्ती जप्त: नेटवर्कशी संबंधित 1,424 बँक खाती तातडीने गोठवण्यात आली असून 17.82 कोटी रुपयांची संपत्ती जप्त.
जप्ती: छापेमारीच्या वेळी 500 डेटोनेटर्स आणि 12 लाख रुपयांची रोकड जप्त.
कारवाई: या गंभीर प्रकरणात सहभाग असलेले 18 प्रमुख आरोपी अटकेत.
मुंबई : मुंबई शहरात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या 'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानाचे मॉडेल आता संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जाणार आहे. या ...
‘डेथ ट्रँगल कॉरिडॉर’चा पर्दाफाश
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे आंतरराष्ट्रीय नार्को-सिंडिकेट ‘डेथ ट्रँगल कॉरिडॉर’चा वापर करून भारत, म्यानमार आणि बांगलादेशच्या सीमांमार्गे अमली पदार्थांची बेकायदेशीर तस्करी करत होते.
31 डिसेंबर 2029 पर्यंत देशातील अमली पदार्थांच्या संपूर्ण नेटवर्कचे मुळापासून उच्चाटन करण्याच्या भारत सरकारच्या दृढ संकल्पाचा हा एक भाग आहे. नार्को-कार्टेलचा पूर्णपणे नायनाट होईपर्यंत अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरूच राहतील, असा स्पष्ट संदेश सरकारने दिला आहे.