Monday, October 26, 2026

Central Railway Delayed Today : मुंबई लोकलचा बोजवारा! ओव्हरहेड वायरला आग अन् रिले रूममधील धुरामुळे मध्य रेल्वे विस्कळीत; संतापलेल्या प्रवाशांची रुळांवरून पायपीट

मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर (विजेच्या तारांवर) एक अनाधिकृत किंवा बाहेरची वायर लटकत असल्याचे आढळले, आणि बघता-बघता त्या वायरला आग लागली. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे लोकल गाड्यांच्या फेऱ्या पूर्णपणे कोलमडल्या.

मुंबई : सोमवारी सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिवस अतिशय मनस्तापाचा ठरला. मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुख्य मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर (विजेच्या तारांवर) एक अनाधिकृत किंवा बाहेरची वायर लटकत असल्याचे आढळले, आणि बघता-बघता त्या वायरला आग लागली. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे लोकल गाड्यांच्या फेऱ्या पूर्णपणे कोलमडल्या.

सकाळी-सकाळी लोकल गाड्यांचे उशिराने धावणे

मध्य रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, सकाळी ९:२३ वाजण्याच्या सुमारास 'डाऊन स्लो' (धीम्या) मार्गावर ही आग लागल्याची आणि वायर लटकल्याची घटना समोर आली. या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. सकाळी ऑफिसच्या वेळी ही परिस्थिती निर्माण झाल्याने स्थानकांवर आणि डब्यांमध्ये मोठी गर्दी झाली होती.

कांजूरमार्गमध्ये रिले रूममधून धूर निघाल्याने भरत चालली भर

एका बाजूला वायरची अडचण सुटत नाही तोच, कांजूरमार्ग रेल्वे स्थानकातील 'रिले रूम'मध्ये (सिग्नल यंत्रणा नियंत्रण कक्ष) अचानक धूर निघाल्याची दुसरी दुर्दैवी घटना घडली. या दोन वेगवेगळ्या तांत्रिक बिघाडांमुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडले. या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया देताना मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी (DRM) सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवाशांना धीर धरण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले की, "वायर हटवण्यासाठी ओव्हरहेड ब्लॉक घ्यावा लागला आणि त्यातच कांजूरमार्गच्या रिले रूममधील धुराच्या प्रकरणाने भर घातली; यामुळे गाड्या एकामागे एक खोळंबल्या असून उशिरा धावत आहेत. प्रवाशांनी सहआर्य करावे, झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत."

संतापलेल्या प्रवाशांची थेट रेल्वे रुळांवरून चालत वाट

गाड्या अतिशय उशिराने आल्यामुळे आणि स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळल्यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला. अखेर कंटाळून अनेक प्रवाशांनी लोकल गाड्यांमधून खाली उतरत मुलुंड आणि नाहूर स्थानकांदरम्यान थेट रेल्वे रुळांवरूनच चालत आपले पुढील अंतर गाठणे पसंत केले. जीव धोक्यात घालून प्रवाशांना अशा प्रकारे पायपीट करावी लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

कल्याण स्थानकात उसळली अलोट गर्दी

मुलुंड आणि ठाणे दरम्यान लटकणारी ती वायर पूर्णपणे काढून टाकण्यासाठी मध्य रेल्वेने अखेर सकाळी १० वाजता ओव्हरहेड उपकरणांचा (OHE) विशेष ब्लॉक मंजूर केला. या ब्लॉकमुळे आणि गाड्यांच्या विलंबामुळे कल्याणसह इतर प्रमुख स्थानकांवर प्रवाशांचा महापूर आल्यासारखी तुफान गर्दी पाहायला मिळाली.

गेल्या १५ दिवसांपासून प्रवाशांचा संघर्ष सुरूच

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना केवळ आजच नाही, तर गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने अशाच प्रकारच्या लोकल विलंबाचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ऐन पीक अवरमध्ये (गर्दीच्या वेळी) गाड्या वेळेवर न आल्यामुळे चाकरमान्यांमध्ये रेल्वे प्रशासनाविषयी तीव्र संताप उसळला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >