Nashik : नाशिक जिल्ह्यात प्रेमविवाहावरून लग्नमंडपात मोठा गोंधळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैदिक पद्धतीने विवाह सुरू असताना नवरीकडील नातेवाईकांनी लग्नाला विरोध केल्याने दोन्ही बाजूंच्या कुटुंबीयांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. लग्न सुरू असतानाच मुलीकडील लोकांनी थेट नवरदेवाला डिझेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या लग्नात नवरी आणि नवरदेवाकडील लोकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत 7 ते 8 जण जखमी झाल्याची माहिती असून, पोलिसांनी दोन्ही गटांतील 14 जणांना ताब्यात घेतले आहे.
दीड महिन्यांपूर्वी पळून जाऊन केला होता प्रेमविवाह
मिळालेल्या माहितीनुसार, येवला येथील पैठणी विणकाम करणाऱ्या कुटुंबातील तरुण आणि निफाड तालुक्यातील रामपूर येथील तरुणी यांच्यात प्रेमसंबंध होते. या दोघांनी 9 सप्टेंबर रोजी घरातून निघून नाशिक येथे नोंदणी पद्धतीने विवाह केला होता.यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी रविवारी हिंदू वैदिक पद्धतीने विवाह सोहळा आयोजित केला होता. लग्नाची तयारी करण्यात आली होती आणि विवाहविधी सुरू होते. मात्र, याच वेळी मुलीकडील नातेवाईक लग्नमंडपात पोहोचले आणि त्यांनी विवाहाला विरोध केला.
नाशिक: ज्या क्षणाची नाशिककर आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण आज आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ...
लग्नमंडपात शाब्दिक वादानंतर तुफान हाणामारी
लग्नाला विरोध केल्यानंतर दोन्ही बाजूंच्या नातेवाइकांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. मात्र, काही वेळातच वाद वाढत जाऊन दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. त्यामुळे लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला. विवाहासाठी जमलेले लोक या प्रकारामुळे घाबरले. मंगलाष्टकांचा सुरू असलेला सोहळा अचानक हाणामारीमुळे विस्कळीत झाला. या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नवरदेवाला डिझेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न ?
या घटनेतील सर्वाधिक गंभीर आरोप म्हणजे मुलीकडील नातेवाईकांनी नवरदेवावर डिझेल टाकून त्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुलाच्या कुटुंबीयांनी केली आहे. या आरोपांमुळे घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे. या हाणामारीत दोन्ही बाजूंच्या मिळून 7 ते 8 जण जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणात दोन्ही गटांतील 14 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रेमविवाहानंतर आयोजित करण्यात आलेल्या विवाह सोहळ्यात झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या वादामागील नेमकी कारणे, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि गंभीर आरोपांमधील तथ्य पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.