
Meerut Murder Case : मेरठमधील चर्चित सौरभ हत्या प्रकरणात मुस्कान आणि साहिल यांच्या उच्च न्यायालयातील अपिलामुळे नवी चर्चा सुरू झाली आहे. दोघांनीही मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात अपील दाखल केले असून, विशेष बाब म्हणजे दोघांच्याही वतीने एकाच वकिलाने अपील सादर केल्याचे वृत्त आहे. साहिलच्या कुटुंबीयांनी या वकिलाची नियुक्ती केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावरून साहिलच्या कुटुंबीयांनी मुस्कानला स्वीकारले आहे, असा निष्कर्ष काढता येणार नाही. याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. ( Meerut Murder Case)
Mumbai-Pune News: मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील जोडमार्गाच्या वापराबाबत महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 नोव्हेंबर ...
खटल्याच्या सुनावणीदरम्यान दोघांसाठी वेगवेगळे वकील
सौरभच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने त्याची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. खटल्याच्या सुनावणीदरम्यान दोघांची बाजू वेगवेगळ्या वकिलांनी मांडली होती.
मुस्कानच्या कुटुंबीयांनी तिच्यापासून अंतर ठेवल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मुस्कानच्या विनंतीनुसार तिला सरकारी वकील रेखा जैन यांची नियुक्ती करण्यात आली होती. दुसरीकडे, साहिलच्या कुटुंबीयांनी त्याच्या बाजूने स्वतंत्र वकिलाची नियुक्ती केली होती.
आता मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करताना दोघांसाठी एकाच वकिलाने बाजू मांडल्याचे समोर आले आहे. मुस्कानने तुरुंग प्रशासनाकडे वकिलाची मागणी केली होती, तर साहिलच्या कुटुंबीयांनीही अपिलासाठी वकिलाची नियुक्ती केल्याचे वृत्त आहे. मात्र, या कायदेशीर घडामोडींवरून दोन्ही कुटुंबांमधील संबंधांबाबत कोणताही ठोस निष्कर्ष काढता येत नाही.
मुस्कानच्या मुलीची जबाबदारी कोण घेणार?
या प्रकरणात मुस्कानच्या मुलीच्या भवितव्याचाही प्रश्न चर्चेत आला आहे. मुलीच्या संगोपनाची जबाबदारी साहिलचे कुटुंब स्वीकारणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
मेरठ कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक वीरेश राज शर्मा यांच्या माहितीनुसार, कारागृहाच्या नियमांनुसार मुलीला कोणाच्या ताब्यात द्यायचे, याबाबत मुस्कानच्या इच्छेला महत्त्व दिले जाईल. साहिलच्या कुटुंबीयांना मुलीची जबाबदारी घ्यायची असल्यास त्यांना त्यासाठी विनंती अर्ज सादर करावा लागेल. त्यानंतर हा अर्ज मुस्कानसमोर ठेवून तिची इच्छा जाणून घेतली जाईल आणि त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
सध्या या प्रकरणातील अपिलाची प्रक्रिया आणि मुलीच्या संगोपनाबाबतचा निर्णय याकडे लक्ष लागले आहे.





